असंख्य सर्पांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:42 AM2021-09-14T04:42:01+5:302021-09-14T04:42:01+5:30
*तुमसरातील सर्पमित्रांचे पर्यावरण संवर्धनात अमूल्य योगदान राहुल भुतांगे १३ लोक २४ के तुमसर : गेल्या अनेक वर्षांपासून तुमसरातील सर्प ...
*तुमसरातील सर्पमित्रांचे पर्यावरण संवर्धनात अमूल्य योगदान
राहुल भुतांगे
१३ लोक २४ के
तुमसर : गेल्या अनेक वर्षांपासून तुमसरातील सर्प मित्रमंडळ सापांच्या जैव विविधतेच्या संवर्धनासाठी व त्यांच्या जीवदानासाठी निरंतर झटत आहेत. गेल्या दोन दिवसांतच त्यांनी ४ नाग, १ मण्यार व १ धामन अशा विविध प्रजातींच्या सापांना जीवदान दिले असून सर्वप्रकारच्या सापांच्या संवर्धनासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची ही निष्काम सेवा निसर्गप्रेमासाठी अखंडपणे सुरू आहे.
सध्या पावसाळ्यात विविध प्रजातींचे असंख्य साप मानवी वसाहतीत आढळून येतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने नाग, मण्यार, घोणस व फुर्से या केवळ चार प्रजातींचे सापच विषारी असतात तसेच काही प्रजाती या निमविषारी असून असंख्य प्रजाती या बिनविषारी असतात. परंतु सर्वसामान्य लोकांच्या मनात मुळात सापांविषयी असलेले अज्ञान, अंधश्रद्धा व चित्रपटातून तयार होणाऱ्या चुकीच्या धारणा यामुळे बहुसंख्य साप हे विनाकारण मारले जातात. परिणामी सापांच्या जैव-विविधतेस अपरिमित धोका निर्माण झाला आहे.
तुमसर शहरातील सर्पमित्र मंडळ आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन व व्यावहारिक कौशल्याने सर्व प्रजातीतील सापांना मानवी अधिवासातून सुरक्षितपणे बाहेर काढत आहेत तसेच त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा एकदा जीवदान देत आहेत. हे त्यांचे कार्य पर्यावरणाच्यादृष्टीने मोलाचे आहे. सध्या आढळून आलेल्या सापांना पचारा वन परिसरातील अरण्यात नैसर्गिकरीत्या सोडण्यात आले. या उपक्रमात प्रामुख्याने दुर्गेश मालाधरे, पराग बाणासुरे, रेणुकादास उबाळे व यश चवडे या सर्पमित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच वनविभागातील ओमप्रकाश मोरे, सचिन देव्हारे, महिला कर्मचारी आर. डी. चौधरी व सुमित देव्हारे या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.