रासेयो शिबिर नागरिक घडविण्याची पाठशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:25 PM2018-01-19T22:25:56+5:302018-01-19T22:26:21+5:30
रासेयो शिबिरातून व्यक्तीमत्व विकसित होते. वेळेचे नियोजन, तडजोड, समाजसेवा या तीन घटकांचा विकास होतो.
आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : रासेयो शिबिरातून व्यक्तीमत्व विकसित होते. वेळेचे नियोजन, तडजोड, समाजसेवा या तीन घटकांचा विकास होतो. श्रमदानातून श्रमप्रतिष्ठा निर्माण होते. विद्यार्थ्यांना शिस्त लावली जाऊन सुजान नागरिक घडवून राष्ट्राला हातभार लावता येतो. परिणामी रासेयो शिबिर हे सुजान नागरिक घडविण्याची पाठशाळा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अजयकुमार मोहबंशी यांनी केले.
कला वाणिज्य पदवी महाविद्यालयाच्या उमरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच आरती रंगारी, व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ. मनिष टेंभरे, पं. स. सदस्य सविता नागदेवे, मानकर, नलिनी बोरकर, नागदेवे, किर्तनकार विद्याराज कोरे महाराज, सुरेश पवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी विजय गणवीर उपस्थित होते. डॉ. मनीष टेंभरे यांनी, स्पर्धेच्या काळात केवळ नोकरीच्या भरवशावर न राहता राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात आयोजित स्वयंरोजगार प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा वापर करून उद्योग निर्माण करा असे प्रतिपादन केले. सविता नागदेवे यांनी, बेरोजगारीवर मात करण्याची व स्वत:च्या पायावर उभे राहण्याची गावकरी व शिबिरार्थी यांना रासेयो द्वारे मिळालेली संधी असल्याच प्रतिपादन केले.
किर्तनकार विद्याराज कोरे महाराज यांनी, बेरोजगारी मिटविणे आवश्यक असल्याने रोजगार निर्माण करा. हागणदारीमुक्त गाव निर्माण करावे. सर्वत्र स्वच्छता पाळावी, मंदिरासारखे गाव स्वच्छ करावे, असे प्रतिपादन केले.
या सात दिवसीय शिबिरात सुरभी कला प्रशिक्षण संस्था नागपूरद्वारे संचालक संदीप देशमुख, सहकारी अंजली यांनी शिबिरामध्ये स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले. यात अगरबत्ती, मेणबत्ती, धुपकांडी, फिनाईल, वॉशिंग पावडर, क्लिनिंग पावडर, स्प्रे, बांधणी, थर्माकोल आर्ट, कलर फिक्सिंग व मार्केटिंग तंत्र समजावून सांगितले. दरम्यान गावातील हनुमान मंदिर परिसरात भरण टाकल्याचे, नाल्या स्वच्छ करणे, गावातून स्वच्छता व आरोग्य विषयक मिरवणूक काढून जनजागृती करण्यात आली.