नूतन कन्याची ‘खुशी’ जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:11 AM2019-05-29T01:11:03+5:302019-05-29T01:11:54+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागातून द्वितीय क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा निकाल ८४.५५ टक्के असून भंडारा येथील नूतन कन्या शाळेची खुशी संतोष गंगवानी ही जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागातून द्वितीय क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा निकाल ८४.५५ टक्के असून भंडारा येथील नूतन कन्या शाळेची खुशी संतोष गंगवानी ही जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. ती वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी असून तिला ९६.४६ टक्के गुण मिळाले आहेत. जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान येथीलच लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा चिन्मय अनिल नवलाखे प्राप्त केला. त्याला ९५.६९ टक्के गुण मिळाले आहेत.
जिल्ह्यातून भंडारा तालुका ९०.२० टक्के निकाल घेऊन आघाडीवर आहे. विशेष म्हणजे मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी ६.८८ इतकी जास्त आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून एकुण १७ हजार ६७२ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १७ हजार ६५७ विद्यार्थी परीक्षेला बसले. यात ८ हजार ८२६ मुले तर ८ हजार ८३१ मुलींचा समावेश होता. त्यापैकी एकुण १४ हजार ९२६ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यात ७ हजार १५७ मुले तर ७ हजार ७६९ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.०९ असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.९७ इतकी आहे.
तालुकानिहाय निकाल
तालुकानिहाय निकालाचा विचार केल्यास भंडारा तालुका निकाल देण्यात अव्वल नंबर ठरला आहे. भंडारा तालुक्यातून ४ हजार २२६ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ८१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लाखनी तालुका असून एकुण ८६.७३ टक्के निकाल लागला आहे. लाखनी तालुक्यातून २२८४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तिसºया क्रमांकावर साकोली तालुका असून निकालाची टक्केवारी ८५.०५ आहे. तालुक्यातून २१७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. चौथ्या क्रमांकावर लाखांदूर तालुका असून निकालाची टक्केवारी ८२.५७ इतकी आहे. तालुक्यातील १४६४ विद्यार्थ्यांपैकी १२०८ विद्यार्थी पास झाले आहेत.
पाचव्या क्रमांकावर पवनी तालुका असून निकालाची टक्केवारी ८२.५५ आहे. पवनी तालुक्यातून २२२३ विद्यार्थ्यांपैकी १८३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सहाव्या क्रमांकावर मोहाडी तालुका असून निकालाची टक्केवारी ८१.३६ इतकी आहे. २२८० विद्यार्थ्यांपैकी १८५५ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी तुमसर तालुका पिछाडीवर असून ७९.३५ टक्के तालुक्याचा निकाल लागला आहे. एकुण ३ हजार ७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २३८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
भंडारा येथील नूतन कन्या शाळेतील विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करीत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. खुशी हिला ६५० पैकी ६२७ गुण प्राप्त झाले आहेत. शाळेतून सीमरन अमर मनवानी हिने ९३.०७ टक्के तर संजना मुरली जसवानी हिने ९२.३० टक्के गुण प्राप्त केले. शाळेचा एकुण निकाल ९२.९३ टक्के लागला आहे. शहरातीलच लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा निकाल ८७.८१ टक्के लागला आहे. खुशी गंगवानी व चिन्मय नवलाखे या दोन्ही गुणवंतांचा शाळेचे प्राचार्य, पदाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय प्राचार्य, शिक्षकगण, आई-बाबांना दिले आहे.
खुशीला बनायचे आहे सीए
जिल्ह्यातून इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या खुशी गंगवानी हिला चार्टंड अकाउंटंट (सीए) बनायचे आहे. यशाचे गमक सांगताना ती म्हणाली, अभ्यास नियमित करत होती. मात्र जिल्ह्यातून प्रथम येईल हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. प्राचार्य सीमा चित्रीव व अन्य शिक्षकांचे मोठे योगदान तसेच आईबाबांचा आशीर्वादाने मला यश प्राप्त झाले, असे ती गौरवाने सांगते. खुशी हिला लहान भाऊ असून त्याने दहावीची परीक्षा दिली आहे. आई मानसी ही गृहिणी असून तिचे बाबा संतोष गंगवानी हे व्यवसायीक आहेत.
शंभर टक्के निकालाच्या सहा शाळा
जिल्ह्यातून सहा उच्च माध्यमिक शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे. यात भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथील पांडव विज्ञान अॅकेडमी ज्युनिअर कॉलेज, समर्थ ज्युनिअर कॉलेज लाखनी, जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज पिंपळगाव सडक ता.लाखनी, राष्ट्रमाता इंदिरा गांधी विज्ञान ज्युनिअर कॉलेज मुरमाडी ता.लाखनी, लॉर्ड लेडी इंग्लीश मिडीयम स्कूल तुमसर व जिल्हा परिषद हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तुमसर यांचा समावेश आहे. जिल्ह्यात शून्य टक्के निकाल देणारी एकही शाळा नाही. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक निकाल देणाºया शाळांची संख्या ४५ इतकी आहे.
शाखानिहाय निकाल
जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून एकुण ७ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७ हजार ७३३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ७ हजार २६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी ९३.९७ इतकी आहे. कला शाखेतून ८ हजार ५२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेच्या निकालाची टक्केवारी ७५.२३ इतकी आहे. वाणिज्य शाखेतून ९०६ विद्यार्थ्यांपैकी ८२९ विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी ९१.५० इतकी आहे. व्होकेशनल शाखेतून ४९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८४.४४ आहे. विशेष म्हणजे जिल्हा भरातून चारही शाखांमधून एकुण विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
चिन्मयला व्हायचंय अंतरीक्ष शास्त्रज्ञ
जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या चिन्मय नवलाखे याला अंतराळ विज्ञानात (स्पेस) प्रचंड आवड आहे. त्याला भविष्यात अंतरिक्ष शास्त्रज्ञ म्हणून नावलौकीक करायचे आहे. तो सद्यस्थितीत इंडियन इन्स्टीट्युट आॅफ सायन्स, एज्युकेशन रिसर्च मध्ये पूर्व परीक्षा देणार आहे. त्यानंतरच समोरची दिशा निश्चित करून आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, असे त्यानी सांगितले. चिन्मयचे बाबा भंडारा येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक असून आई उज्ज्वला या गृहिणी आहेत. चिन्मयचा लहान भाऊ तन्मय हा आठव्या वर्गात आहे.