मुदतीपूर्वीच मागितल्या हरकती
By admin | Published: June 23, 2016 12:21 AM2016-06-23T00:21:16+5:302016-06-23T00:21:16+5:30
मामा तलावांच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी मागविण्यात आलेल्या ई-निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला.
प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : ई-निविदाच्या शुध्दीपत्रकात चुका
प्रशांत देसाई भंडारा
मामा तलावांच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी मागविण्यात आलेल्या ई-निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. ‘लोकमत’ने प्रकरण उघडकीस आणल्यानंतर निविदा रद्द केली. याबाबत शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले. यात कार्यकारी अभियंता व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळस गाठून निविदा सादर करण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच हरकती मागीतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लघु पाटबंधारे विभागाने तलावांच्या सर्वेक्षणाबाबत निविदा मागितल्या. मात्र, सदर कामाचे कंत्राट मर्जीतील मजूर सहकारी संस्थेला मिळावे यासाठी कार्यकारी अभियंता यांनी ई-निविदेत तशी तरतुद केली होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्याने प्रशासनात खळबळ उडाली व सदर विभागाने ती निविदा रद्द केली. त्यानंतर त्यांनी शुध्दीपत्रक क्रमांक - २ प्रसिध्दीस दिले. यातही मोठा घोळ केला आहे. यात कामांचा तपशील दिलेला नाही. त्यामुळे सदर विभागप्रमुखांकडून मोठ्या प्रमाणात अपहार करण्याची शंका उपस्थित होत आहे. या शुध्दीपत्रकात अंतिम तारीख २५ जून दुपारी १ वाजेपर्यंत नमूद केली आहे. मात्र, याबाबत कुणाला मते व हरकती सादर करावयाची असल्यास त्यांनी २१ जूनला सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे व त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही, असे नमुद केले आहे. त्यामुळे निविदा सादर होण्यापूर्वीच हरकती घेण्याचा हा प्रकार संशयास्पद आहे. या शुध्दीपत्रक क्रमांक-२ वर कार्यकारी अभियंता व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी आहे. ही बाब त्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी सारवासारव सुरू केली आहे.
कामासंबंधात निविदा सादर करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी हरकती मागविण्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रीबीड सभा २१ जूनला बोलविली. सभेत अनेकांनी हरकती दिल्या. मात्र, त्यात नविन काही समाविष्ठ करण्यायोग्य नसल्याने विशेष बदल केले नाही. निविदेत अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे या हरकती मागविण्यात आल्या. २५ जूनपर्यंत हरकती मागविल्या आहेत.
- जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा.
कामाबाबत कंत्राटदारांना काही अडचणी असल्यास हरकती घेतल्या जाते. त्यामुळे प्रीबीड सभा बोलविली होती. चंद्रपूर येथे चार जिल्ह्याची महत्वाची बैठक होती. यात मामा तलावांच्या देखभाल दुरूस्तीसंबंधी चर्चासत्र असल्याने तिथे उपस्थित होतो. माझ्या कामात पूर्णपणे पारदर्शकता आहे. उद्याला परत येतोय तेव्हा माझ्या कार्यालयात या विस्तृत बोलू.
- रामदास भगत, प्रभारी कार्यकारी अभियंता, लपा, भंडारा.