वाढती लोकसंख्या विकासासाठी अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2016 12:22 AM2016-07-11T00:22:37+5:302016-07-11T00:22:37+5:30
वाढती लोकसंख्या ही विकासातील मोठा अडथळा आहे. या वाढत्या लोकसंख्येला सोयी सुविधा पुरवण्यिासाठी शहरपातळीवर कोणकोणत्या योजना राबवायला हव्यात,...
आज जागतिक लोकसंख्या दिन : स्मार्ट शहर करणे काळाची गरज
देवानंद नंदेश्वर भंडारा
वाढती लोकसंख्या ही विकासातील मोठा अडथळा आहे. या वाढत्या लोकसंख्येला सोयी सुविधा पुरवण्यिासाठी शहरपातळीवर कोणकोणत्या योजना राबवायला हव्यात, या विषयीचे विश्लेषण करतानाच दुसऱ्या बाजूला वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, शहराचे कसे बकालीकरण होत आहे, यावर टाकलेली नजर ११ जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने.
जिल्ह्यातील शहरांचा दशवार्षीक वृध्दीदर ६.४ टक्के आहे. शहरीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारतो. मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. त्याचरोबर खेड्यांचासुद्धा विकास होत असतो. परंतु विकासाबरोबरच शहरीकरणाची काळी बाजूसुद्धा ठळकपणे दिसून येते. शहरीकरणामुळे सोयीसुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण वाढतो व शहरी वातावरणाचा समतोल बिघडतो.
काही शहरी वगळता सर्व शहरांमध्ये सध्याच्या लोकसंख्येला आवश्यक असलेला पाणीपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था याची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासते. त्या पुरवतानाच स्थानिक संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच वाढीव लोकसंख्येमुळे त्या सोयीसुविधांवर आणखीनच प्रचंड ताण पडणार आहे. या सर्व सुविधांची गरज २०३० पर्यंत कितीतरी पटीने वाढणार आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लक्ष ३३४ एवढी आहे. यात ६ लक्ष ५ हजार ५२० पुरुष, ५ लक्ष ९४ हजार ८१४ महिलांचा समावेश आहे.
शहरी भागात २ लक्ष ३३ हजार ८३१, तर ग्रामीण भागात ९ लक्ष ६६ हजार ५०३ लोकसंख्येचा समावेश आहे. साक्षरतेची संख्या ८ लक्ष ९९ हजार ८६० असून ३ लक्ष ४७४ नागरीक निरक्षर आहेत. महिला- पुरुषाचे प्रमाण ९८२ एवढे आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराच्या लोकसंख्या वाढीचा दशवार्षीक वृध्दीदर भंडारा ७.८, तुमसर ६.८, पवनी १, ठाणा २६, शहापूर ११.२, बेला २८.३, गणेशपूर १२.३, सावरी जवाहरनगर २६.७, चिखला ३.७, वरठी २०.५, साकोली ०.६ तर मुरमाडी २६.६ टक्के आहे.
शहरांना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे पाणीपुरवठा, ज्याची मागणी २.५ पटीने होणार आहे. आजच शहरातील जमा झालेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योग्य जागा व व्यवस्था उपलब्ध नाही. २०३० पर्यंत घनकचऱ्यामध्ये ५ पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे. दुसरी समस्या म्हणजे रस्ते आणि वाहतूक. मोठ्या शहरातील वाहतूक व्यवस्था घाईगर्दीच्या वेळेमध्ये नेहमीच कोलमडते.
खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आजच गर्दीच्या वेळी रस्त्यांवर वाहनांची रांगच रांग लागते. २०३० पर्यंत खासगी वाहनांची संख्या जवळपास दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर आतापासूनच विचार केला नाही तर भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल.
शहरातील बहुतांश लोकसंख्या ही लघू आणि मध्यम उत्पन्न गटातील असते. शहरातील गगनाला भिडणाऱ्या जमिनीच्या दराने तसेच बांधकामाच् या वाढीव खर्चामुळे त्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना नाईलाजाने झोपडपट्टीचा आसरा घ्यावा लागतो. शहरीकरणाचा परिणाम पर्यावरणावरही मोठ्या प्रमाणावर होत असतो. शहरीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असते. . त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडतो. डोंगराचा ऱ्हास होतोय. काँक्रीट, अस्फाल्ट, विटा यासारखे साहित्य उष्णता शोषून घेतात. त्यामुळे शहरातील हवा रात्रीसुद्धा गरम असते. शहरातील वेगवेगळ्या घडामोडींमध्ये वातावरणात वेगवेगळे विषारी द्रव्य उत्सर्जीत केले जातात.
आता शहरातून एकत्र कुटुुंब पद्धती जवळजवळ नाहीशाच झाल्या आहेत. सर्वजण आत्मकेंद्रीत झाले आहेत. ते स्वत:च्या कोशात मग्न असून त्यांची सामाजिक बांधिलकी कमी होत चालली आहे. शहरातील मोकळी जागा वाढविणे अशक्य आहे. त्या उलट लोकसंख्येच्या अतिक्रमणामुळे मोकळ्या जागा, मैदाने कमी होत आहेत. त्याचाच विपरीत परिणाम लहान मुलांच्या मन:स्वास्थावर व वाढीवर होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शाळा, महाविद्यालय, दवाखाने, यासारख्या सोयीसुविधांची आताच वानवा भासत आहे.
शहरात जागेची कमतरता असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा समावेश करण्यासाठी गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहे. त्यामुळे अग्नी सुरक्षा, वाहतूक समस्या निर्माण होत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे आणखी एका महत्वाच्या बाबीवर परिणाम झाला आहे. तो म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. वातावरणातील ध्वनिप्रदूषण, दिवसभराची धावपळ, मोठ्या प्रमाणावर मनावर होणारा ताण यामुळे शरीर आणि मनस्वास्थावर परिणाम होत आहे. श्वसनविकार, हृदयविकार अशा रोगांमध्ये वाढ दिसून येते. वेगवेगळ्या रोगांचा जसे डेंगू, मलेरिया यांचा प्रादूर्भाव मधून मधून होतच असतो. एकंदरीत यावरील सर्व समस्या आताच निवारणे कठीण झाले आहे.