वहिवाट गणेशपुरात; मतदान भंडाऱ्यात
By admin | Published: May 14, 2016 12:23 AM2016-05-14T00:23:43+5:302016-05-14T00:23:43+5:30
गणेशपूर ग्रामपंचायतीची हद्द भंडारा नगरपालिका क्षेत्रातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाका ईथपर्यंत विस्तारलेली आहे.
सीमावादात नागरिकांची फरफट : राज्य शासनाचा लाखोंचा महसूल बुडतोय
नंदू परसावार / प्रशांत देसाई भंडारा
गणेशपूर ग्रामपंचायतीची हद्द भंडारा नगरपालिका क्षेत्रातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाका ईथपर्यंत विस्तारलेली आहे. तलाठी कार्यालयाच्या नोंदीनुसार येथील नागरिकांची वहिवाट ही गणेशपुरात आहे. भंडारा व गणेशपूर या दोन गावांमध्ये सिमावादाच्या मुद्यावर राज्य शासनाने अद्याप तोडगा काढलेला नाही. त्यामुळे शासकीय नोंदीनुसार वहिवाट गणेशपूर असली तरी येथील काही नागरिकांचे मतदान व करआकारणी भंडारा नगरपालिका करीत असल्याचा विचित्र प्रकार ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत भेटीत समोर आला.
कुठल्याही गावाचे सीमांकन हे भूमिअभिलेख व तलाठी कार्यालयात असलेल्या नोंदी व नकाशावरून स्पष्ट होते. गावाच्या सीमांकनासाठी हे अभिलेख महसुल विभाग अधिकृत समजतात. भंडारा नगरपालिकेने कर वाढविण्याच्या हेतूने गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सीमेतील काही भागांना सामावून घेतले. वास्तविकतेत गणेशपूरच्या हद्दीतील ज्या वस्त्यांवर पालिका हक्क दाखवित आहे. ती वसाहत शासकीय दस्तऐवजानुसार आजही गणेशपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट असल्याची नोंद आहे.
भंडारा नगरपालिकेच्या शहर विकास कार्यक्रम राबविणाऱ्या विभागाने त्यांच्या अखत्यारितील भूखंडासोबतच गणेशपूरच्या हद्दीतील वसाहतींनाही त्यांच्या हद्दीत येत असल्याची नोंद करून हा प्रकार घडवून आणला आहे. वास्तविक पाहता हा प्रकार अनागोंदी असल्याचे शासकीय दस्तावेजावरून दिसून आला आहे.
यातील किचकट प्रकार असा की, या वसाहतीतील नागरिकांची वहिवाट ही शासकीय दफ्तरी नोंदीनुसार गणेशपूर असली तरी, त्यांचे मतदान प्रक्रियेतील नाव भंडारा नगरपालिका क्षेत्रात येत आहे. गणेशपूर ग्रामपंचायतीचे रहिवासी ऐवजी ते भंडारा शहराचे नागरिक म्हणून पालिकेच्या निवडणुकीत मतदान करतात. एवढेच नव्हे तर, हे सर्व नागरिक भंडारा पालिकेला नित्यनेमाने गृहकर भरतात. यातील काही कुटूंब तर गणेशपूर ग्रामपंचायत आणि भंडारा पालिकेलाही कर भरत नसल्याची बाब या भेटीदरम्यान समोर आली. सीमावादाच्या कचाट्यात गणेशपूर ग्रामपंचायतीचा वर्षाकाठी लाखोंचा कर बुडत आहे.
गणेशपूर ग्रामपंचायतीची पालिकेतील सीमा
मिशन शाळेजवळ उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारापासून गणेशपूरची हद्द सुरू होते. वास्तविक पाहता ही सीमा याहीपुढे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद चौकापासून राजीव गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डावीकडील भाग गणेश शाळेपर्यंत. राजीव गांधी चौकापासून तकीया वॉर्ड, औद्योगिक वसाहत, काही भाग भोजापूर या गावाला जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत. कपील नगर, पोलीस वसाहत ही सर्व गणेशपूर ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असल्याची नोंद तलाठी सातबारावर आहे.
दाखल्यासाठी नागरिकांची पायपीट
गणेशपूर ग्रामपंचायतीचे रहिवासी असतानाही अनेकांना भंडारा पालिकेने रहिवासी बनविले आहे. त्यामुळे अनेकांनी पालिका व ग्रामपंचायतीला कर भरलेला नाही. मुलांच्या शैक्षणिक कामासाठी जेव्हा दाखल्याची गरज भासते. त्यावेळी पालक पालिका व ग्रामपंचायतीत धाव घेतात. नियमानुसार कर भरल्याखेरीज दाखला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा रेकॉर्ड तपासला असता दोन्ही ठिकाणी नोंद आढळून येत नसल्यामुळे दाखल्यासाठी पालकांची फजिती होते.