कारवाईच्या नावावर अधिकाऱ्यांची शिजली 'डाळ'!
By admin | Published: November 27, 2015 12:44 AM2015-11-27T00:44:41+5:302015-11-27T00:44:41+5:30
तूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने राज्यातील साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. भंडारा जिल्ह्यातही अन्न पुरवठा विभागाच्यावतीने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले.
अन्न पुरवठा विभागातील प्रकार : भरारी पथकांच्या दौऱ्यावर हजारोंचा खर्च व्यर्थ
प्रशांत देसाई भंडारा
तूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने राज्यातील साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. भंडारा जिल्ह्यातही अन्न पुरवठा विभागाच्यावतीने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. यासाठी पथकावर हजारो रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, कारवाईत एक किलोही डाळ सापडली नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाईच्या नावावर मात्र स्वत:ची ‘डाळ’ शिजविल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
भाजपने सत्ता स्थापनेपूर्वी मतदारांना ‘अच्छे दिन’ येणार असे आश्वासन देऊन केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, काही दिवसांच्या कालावधीनंतर सर्वच वस्तूंचे दर वाढत चालले आहे. यात गरिबांच्या रोजच्या जीवनातील तूर डाळीचाही समावेश आहे. कधी नव्हे ते, यावर्षी डाळ २०० रूपये किलोपर्यंत वाढली. यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारविरूध्द संतापाची लाट उसळली. यामुळे तूर डाळीची साठेबाजी करण्यामुळे दरवाढ झाली, असा समज करुन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना राज्यातील साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे आदेश दिले.
दस्तूरखुद्द मंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्याच्या सचिवांचे भंडारा येथील अन्न पुरवठा विभागात आदेश धडकताच अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी अनिल बन्सोडे यांनी भरारी पथक तयार केले. भंडारा येथे एक पथक तर तालुक्यात स्थानिक तहसील कार्यालयातील याप्रमाणे जिल्ह्यात सात पथक स्थापन करण्यात आले. दरम्यान, या पथकाने जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. अनेक ठिकाणी साठेबाजी असल्याचे या पथकाला आढळून आले. मात्र, त्यांच्याकडून कारवाईचा फार्स ठरला. दरम्यान प्रशासकीय कारभाराने त्रस्त झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विभागाचे सचिव दीपक कपूर यांना चांगलेच धारेवर धरून कारवाईचा अहवाल तातडीने मागून कामात पारदर्शकता आणण्याचे निर्देश दिले. ज्याठिकाणी काही अर्थपूर्ण व्यवहार झाले नाही, अशाठिकाणी या पथकाने व्यापाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे प्रकारही समोर आले आहे. एकूणच या पथकांवर शासनाने हजारो रूपयांचा खर्च केला. कारवाईत एक किलोच्याही डाळीची साठेबाजी पथकाला आढळून आली नाही, हाच संशोधनाचा विषय आहे.
धाडी टाकल्या मात्र कारवाई शून्य
भंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी येथील काही व्यापारी डाळीची विक्री करण्यात पुढारले आहेत. लगतच्या मध्यप्रदेशातून जिल्ह्यात डाळ विक्रीसाठी आणली जाते. डाळीच्या किंमतीत वाढ झाल्याने दिवाळीचे महत्त्व ओळखून व्यापाऱ्यांनी डाळीची साठेबाजी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी यात हात ओले केल्याने ‘आॅल इज वेल’ म्हणून हात वर केल्याची चर्चा आहे.