अधिकाऱ्यांनाही वाङ्मयीन संस्कृतीचे भान असावे
By admin | Published: May 6, 2016 12:38 AM2016-05-06T00:38:02+5:302016-05-06T00:38:02+5:30
वाङ्मयाचा मानवी मनावर उदात्त, व्यापक मानवतावादी संस्कार होत असतो. वाङ्मयीन जाण असलेला माणूस एकांगी अभिनेवेशी किंवा संकुचित वृत्तीचा राहत नाही.
लखनसिंह कटरे यांचे प्रतिपादन : युगसंवादचा कवी आणि कविता उपक्रम उत्साहात
भंडारा : वाङ्मयाचा मानवी मनावर उदात्त, व्यापक मानवतावादी संस्कार होत असतो. वाङ्मयीन जाण असलेला माणूस एकांगी अभिनेवेशी किंवा संकुचित वृत्तीचा राहत नाही. म्हणूनच प्रशासकीय सेवांमधील व्यक्तींनीही वाङ्मयीन संस्कृतीचे भान जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी लखनसिंह कटरे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा लाखनी, मैफल लाखनी आणि युगसंवाद वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी येथील समर्थ विद्यालयात संपन्न झालेल्या कवी आणि कविता या उपक्रमाच्या दुसऱ्या भागात निमंत्रीत कवी म्हणून लखनसिंह कटरे सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पोहरकर होते. याप्रसंगी प्रा.बे. तु. आगाशे, डॉ.अनित नितनवरे, डॉ.गिरीश सपाटे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी कटरे यांच्या मौलिक काव्यकर्तृत्वाप्रीत्यर्थ अध्यक्ष डॉ.पोहरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांची मुलाखत डॉ.सपाटे यांनी घेतली. या मुलाखतीतून कवी कटरे यांनी आपल्या वैयक्तिक, सामाजिक व वाङ्मयीन जीवनाचा भेदक आलेख मांडला. डाव्या, उजव्या विचारधारांच्या प्रवाहात वाहून न जाता मी निरपेक्षपणे जगलो. प्राचीन अर्वाचिन वाङ्मय, फुले आंबेडकर व सावरकरांचे वाङ्मय तसेच अध्यात्मनिष्ठ साहित्याचा मी गंभीरपणे आस्वाद घेतला. या पुस्तकांनी आणि जीवनातील विविध अनुभवांनी मला घडविले. जीवनातील अतर्क्यतेने, गुढतेने मला खुपदा असह्य केले पण मी जीवनाच्या कुठल्याही अवस्थेत निराश झालो नाही, असे विचार त्यांनी मांडले.
मुलाखतीनंतर कटरे यांनी सात संस्मरणीय कवितांचे अभिवाचन केले. यावेळी प्रा.भगवंत शोभणे आणि प्रा.विनोद मेश्राम यांनी आस्वादक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघ भंडारा शाखेच्या कार्यकारी मंडळाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले. तर संचालन अक्षय मासुरकर यांनी केले. आभार दा. र. प्रधान यांनी मानले. काव्यसोहळ्यासाठी प्रल्हाद सोनेवाने, प्रा.मुकुंद देशपांडे, ज्ञानेश्वर नेवारे, प्रा.करूणकुमार पिडथल, देवानंद नांदेकर, प्रमोदकुमार अणेराव, डॉ. जयश्री सातोकर, मनोज केवट, हर्षल मेश्राम, जयकृष्ण बावनकुळे, विदर्भ साहित्य संघ लाखनीचे कार्यकर्ते, समर्थ विद्यालय लाखनी येथील शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)