‘आॅफलाईन’ निविदाचे ‘वर्कआॅर्डर’ रखडले!
By admin | Published: June 29, 2016 12:37 AM2016-06-29T00:37:02+5:302016-06-29T00:37:02+5:30
तुमसर व पवनी तालुक्यातील सात मामा तलावांच्या कामांसाठी आॅफलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या.
प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : मर्जीतील कंत्राटदारांसाठी निवडली शक्कल
प्रशांत देसाई भंडारा
तुमसर व पवनी तालुक्यातील सात मामा तलावांच्या कामांसाठी आॅफलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. ही निविदा १४ जूनला उघडायची होती. मात्र, १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही त्या कामांचे वर्कआॅर्डर देण्यात आलेले नाही. केवळ मर्जीतील कंत्राटदारांना काम देण्याच्या नादात ही प्रक्रिया रखडल्याचा प्रकार समोर आला आहे.
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या मामा तलावांच्या कामांसाठी राज्य शासनाकडून सुमारे तीन लाखांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीत तुमसर तालुक्यातील गर्रा (बघेडा), सितासावंगी व आसलपाणी येथील तीन तर पवनी तालुक्यातील शेगांव, कमकाझरी, सुरभी व मिन्सी या चार ठिकाणच्या मामा तलावांच्या कामांसाठी निधी प्राप्त झाला. ही सर्व कामे तीन लाखांच्या आतील असल्याची माहिती आहे. तवालांच्या कामांसाठी कंत्राटदारांकडून यासाठी लिफापा पध्दतीने (आॅफलाईन) निविदा मागितल्या होत्या. या निविदा १४ जूनला उघडण्याची तारीख प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, १५ जून ते २६ जूनपर्यंत कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे वैद्यकीय रजेवर होते.
दरम्यान, या कामांसाठी आलेल्या निविदांचे लिफापे उघडण्यात आले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून संदीप जांभूळपाणी यांची निविदा सर्वात कमी दराची होती. मात्र, त्यांना काम देण्याची अनास्था व मर्जीतील कंत्राटदारांचे दर जास्त असल्याने कंत्राट देण्याची अडचण निर्माण झाली. त्यामुळे रजेवर असताना पराते यांनी सदर मर्जीतील तिन्ही कंत्राटदारांचे लिफापे नागपूरला बोलवून त्यांना काम देण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मर्जीतील कंत्राटदारांना काम देता यावे, यासाठी १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही कामांचे वाटप किंवा वर्कआॅर्डर दिलेले नाही. यामुळे कमी दर असलेल्या कंत्राटदारानेही आता कंबर कसल्याची माहिती आहे. लघु पाटबंधारे विभागात नवनवे प्रकरण बाहेर येत असून प्रशासन कार्यकारी अभियंत्यांना पाठीशी घालीत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
निविदा उघडण्याचा १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही त्यांचे वर्कआॅर्डर कुणाही कंत्राटदाला देण्यात आलेले नाही. मर्जीतील कंत्राटदारांसाठी यात अनिमितता तर केली नाही ना? किंवा वर्कआॅर्डर देण्यास होत असलेल्या विलंबाबात कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पराते यांच्या ९८२३३९६८६७ या भ्रमणध्वनीवर सायंकाळी ५.५० व ६.१९ वाजता संपर्क साधला असता कॉल उचलला नाही.