युनिव्हर्सलच्या स्वच्छतेवर जुन्या कामगारांचा आक्षेप
By admin | Published: November 3, 2016 12:40 AM2016-11-03T00:40:48+5:302016-11-03T00:40:48+5:30
तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु होण्याच्या हालचालींना जुन्या कामगारांनी ब्रेक लावला.
काम पाडले बंद : जुनी थकीत रक्कम द्या, नंतरच कामे करा
तुमसर : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु होण्याच्या हालचालींना जुन्या कामगारांनी ब्रेक लावला. कारखाना परिसर स्वच्छ करण्याकरिता आलेल्या मजुरांची कामे त्यांनी बंद केले. आधी जुनी थकीत रक्कम द्या व नंतरच कामे सुरु करा असा पवित्रा जुन्या कामगारांनी घेतला आहे. हा कारखाना सन २००५ पासून आजतागायत बंद आहे.
माणेकनगर (माडगी) येथे मॅग्नीज धातू शुद्धीकरण करणारा युनिव्हर्सल फेरो कारखाना आहे. थकीत वीज बिलापोटी वीज कापल्याने हा कारखाना सन २००५ पासून बंद आहे. सुरुवातीला येथे सुमारे १२०० कामगार कार्यरत होते.
सन १९९९ मध्ये सर्वप्रथम या कारखान्यावर ५० कोटी वीज बिल थकीत होते. ती रक्कम वाढत सुमारे १५० कोटी झाली होती. सन २००३ मध्ये हा कारखाना काही अटीवर पुन्हा सुरु झाला.
दोन वर्षानंतर सन २००५ मध्ये तो पुन्हा बंद झाला. आजपर्यंत तो कायम बंद आहे. दरम्यान कंपनी मालकाने या कारखान्याला आजारी कारखाना म्हणून संबंधित लवादाकडे प्रकरण नेले. येथील काही स्थायी कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली तर काही कामगारांनी न्यायालयीन लढा दिला. तो आजपर्यंत सुरु आहे. या दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने अभय योजनेअंतर्गत प्रकरण दाखल केले. या अंतर्गत कारखान्याचे सुमारे १४२ कोटी रुपये माफ करण्यात आले. परंतु यात कारखाना सुरु करण्याची अट घालण्यात आली. ती अट व्यवस्थापनाने मान्य केली.
या अटीत मार्च २०१७ पासून कारखाना सुरु करण्यात यावा असे नमूद आहे. त्याकरिता व्यवस्थापनाने कारखाना सुरु करण्याच्या येथे हालचाली सुरु केल्या. परंतु आधी कामगारांची थकीत कंपनी व्यवस्थापनाने द्यावी तथा संपूर्ण हिशोब करावा व नंतरच कारखाना सुरु करावा असा पवित्रा जुन्या कामगारांनी येथे घेतला आहे. जुन्या कामगारांची संख्या सुमारे २०० च्या जवळपास आहे. कंपनी व्यवस्थापनाने येथे सरसकट ५ लक्ष देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आहे. येथे कामगारांनी १० वर्षाचे किमान १० लक्ष द्यावे अशी मागणी व्यवस्थापनापुढे ठेवल्याचे समजते. दरम्यान दिवाळीनंतर यासंदर्भात कंपनी व्यवस्थापन तथा कामगारांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.
अभय योजनेचा लाभ घेतल्याने येथे दिलेल्या अवधीत कारखाना मार्च महिन्यात सुरु करणे अनिवार्य आहे. मागील दहा वर्षापूर्वी हा कारखाना सुरळीत सुरु होता. परंतु वीज बिल थकीत प्रकरणी येथे समस्या निर्माण झाली.
मुळात हा कारखाना आजारी कारखान्याच्या यादीत नव्हता हे विशेष. राज्य शासनाने वीज बिल माफ करणे, प्रती युनिट वीज बिल कमी करणे, यामुळे हा कारखाना सुरु होण्याच्या मार्गावर आहे. अडीच महिन्यापूर्वी कारखाना पूर्ववत सुरु करण्याकरिता शिवसेनेने येथे आंदोलन पुकारले होते हे विशेष. त्यानंतर हा कारखाना पुन्हा चर्चेत आला होता. (तालुका प्रतिनिधी)