अन् थोडक्यात वाचला वृद्धाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 08:39 PM2018-11-18T20:39:59+5:302018-11-18T20:42:27+5:30
शहरातील बसस्थानक परिसराला लागलेल्या जुन्या चुंगी नाका येथील चौथ्या क्रमांकाचे सीमेंट गाळ्यातील स्लॅब अचानक कोसळले. यात सुदैवाने एका तरुणाच्या समयसूचकतेमुळे ६० वर्षीय वृद्ध इसमाचे प्राण थोडक्यात वाचले. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील बसस्थानक परिसराला लागलेल्या जुन्या चुंगी नाका येथील चौथ्या क्रमांकाचे सीमेंट गाळ्यातील स्लॅब अचानक कोसळले. यात सुदैवाने एका तरुणाच्या समयसूचकतेमुळे ६० वर्षीय वृद्ध इसमाचे प्राण थोडक्यात वाचले. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. संतोष कपूर असे या घटनेतून बचावलेल्या इसमाचे नाव असून मोहम्मद अन्सारी असे प्राण वाचविणाºया तरुणाचे नाव आहे.
बसस्थानक परिसराला लागून असलेल्या इंग्रजकालीन चुंगी नाका आहे. हा नाका बंद असला तरी याच्या पाठीमागे सीमेंट गाळ्यांचे बांधकाम पालिका प्रशासनाने केले आहे. या बांधकामाला जवळपास तीन दशकांचा कालावधी लोटला आहे. परंतु या गाळ्यांची स्थिती दयनीय झाली असून पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात गळती होत असते. त्यामुळे येथील दुकानदारांनी अनेकदा पालिका प्रशासनाला यापूर्वीही अपघात घडण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र याकडे पालिकेने दुरुस्तीकडे नेहमी कानाडोळा केला.
रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास संतोष कपूर हे गाळा क्रमांक ४ मध्ये बसले असताना स्लॅबचा मोठा भाग अचानक खाली कोसळला. याच वेळी बाजूला उभे असलेल्या मोहम्मद अन्सारी या तरुणतुर्क तरुणाने प्रसंगावधान साधून वेळीच कपूर यांना बाहेर ओढले. क्षणात मोठा मलबा दुकानात कोसळला. काही दिवसांपूर्वीही याच गाळ्यातील स्लॅबचा एक तुकडा खाली कोसळला होता. अन्य गाळ्यांचीही अशी स्थिती झाली आहे. या बाबत सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरुगकर, जुनैद खान यासह अन्य नागरिकांनी पालिका प्रशासनाला गाळा दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र त्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली.