दीड महिन्यांपासून बिबट पिंजऱ्यातच
By admin | Published: December 27, 2014 01:05 AM2014-12-27T01:05:59+5:302014-12-27T01:05:59+5:30
नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या जांभळी खांबा येथील महिलेला ठार केलेल्या बिबट्याला वनविभागाने दि.६ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले.
साकोली: नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या जांभळी खांबा येथील महिलेला ठार केलेल्या बिबट्याला वनविभागाने दि.६ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले. तेव्हापासून हा बिबट गडेगाव येथे पिंजऱ्यात आहे. मात्र त्याला कधी सोडण्यात येईल याची खात्री वनविभागालाही नाही. त्याच्यावर अनजुनही औषधोपचार सुरूच आहे, असे वनविभागातर्फे सांगण्यात येत आहे.
ज्यावेळी हा बिबट पिंजऱ्यात पकडण्यात आला त्यावेळी या बिबट्याची तीन नखे गळून पडलेली होती. त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. नंतर पिंजऱ्यातच हा बिबट डोके आपटत असल्याने त्याच्या डोक्याला जखम झाली. औषधोपचारानंतर बिबट्याच्या डोक्यावरची जखम दुरूस्त झाली असली तरी पायाची जखम अजूनही दुरूस्त झाली नाही. त्यामुळे त्याचेवर अजूनही औषधोपचार सुरू आहे, अशी माहिती वनविभागाने दिली.
मृतकाचे कुटुंबीय मदतीपासून वंचित
जांभळी येथील महिलेला ठार केल्यानंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी वनविभागातर्फे मृतक महिलेचा कुटूंबियांना पाच लक्ष रूपयाची मदत वनविभागातर्फे देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी वनविभागाकडून ही मदत अजुनपर्यंत मिळाली नाही. (तालुका प्रतिनिधी)