तुमसर बाजार समितीला एक कोटीचे आर्थिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:42 AM2021-09-08T04:42:34+5:302021-09-08T04:42:34+5:30
मोहन भोयर तुमसर : राज्यात धानाची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीला चालू वर्षात एक कोटीचे ...
मोहन भोयर
तुमसर : राज्यात धानाची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीला चालू वर्षात एक कोटीचे आर्थिक नुकसान झाले आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यात मोठ्या संख्येने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राला शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान थेट आधारभूत खरेदी केंद्रावर जात आहे. मोठे व्यापारी थेट बांधावर धानाची खरेदी करीत आहेत. त्याचा फटका बाजार समितीला बसला आहे. सेसच्या स्वरूपात बाजार समितीला मिळणारे उत्पन्न घटले आहे. शासनाने या बाजार समितीला शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राला मंजुरी दिली नाही. याउलट शासकीय धान्य खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. हे विशेष.
पूर्व विदर्भात, तसेच राज्यात धानाची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून तुमसर बाजार समितीचा उल्लेख करण्यात येतो. या बाजार समितीत धानाची आवक कमी झाली असून, त्याचा फटका बाजार समितीच्या उत्पन्नाला बसला आहे. राज्य शासनाने तुमसर व मोहाडी तालुक्यात ४० ते ४२ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू केली. त्यामुळे येथील शेतकरी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करीत आहेत, तर काही मोठे व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धानाची खरेदी करीत आहेत, त्यामुळे बाजार समितीत येणारे धान कमी झाले आहे. यामुळे बाजार समितीला सेसच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे कमी झाले आहे. यापूर्वी बाजार समितीला सेवेच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न येत होते. ते आता एक कोटीवर आल्याची माहिती आहे.
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र तुमसर व मोहाडी तालुक्यात असून, ही दोन्ही तालुके धानपट्ट्याची आहेत. या बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न हे धान खरेदीवरच आहे. इतर रबी पीक येथे विक्रीला कमी प्रमाणात येतो. सदर बाजार समितीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी मागितली होती; परंतु या बाजार समितीला शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली नाही. उलट पवनी व लाखणी या दोन्ही बाजार समितीमध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे मात्र देण्यात आली आहेत.
बॉक्स
अडते, दलालही आर्थिक संकटात
तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे अडते आणि दलाल आहेत. धान विक्रीकरिता येथे पूर्वीसारखे येत नसल्यामुळे तेही आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनाही आता पूर्वीसारखे काम राहिले नाही. काही अडते आणि दलाल इतर व्यवसायाकडे वळत आहेत. तीन कृषी कायद्यांचा फटका येथे बसत असल्याची चर्चा बाजार समिती परिसरामध्ये सुरू आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होणे व व्यापारी थेट बांधावर जाऊन धानाची खरेदी करू शकतात त्याचाही फटका येथे आता बसला आहे.
बॉक्स
प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता
संचालक मंडळाची मुदत २० सप्टेंबर पर्यंत
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २० सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानंतर २१ सप्टेंबरपासून येथे प्रशासकांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोणाच्या संक्रमण काळात निवडणुका होतील किंवा नाही याबाबत अजूनही शाश्वती नाही. या बाजार समितीवर सहकार विभागाच्या नियमानुसार कामे झाली नाहीत असा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथे प्रशासकांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. याकरिता महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पदाधिकारी यांनी फिल्डिंग लावल्याचे समजते.