मुद्रांक विक्रेता संघटनेचे एकदिवसीय कामबंद आंदोलन; शंभर व पाचशेचे मुद्रांक सुरू ठेवण्याची मागणी
By युवराज गोमास | Published: October 30, 2023 06:01 PM2023-10-30T18:01:55+5:302023-10-30T18:03:02+5:30
मुद्रांक कमिशन वाढवा : तहसील कार्यालयासमोरील कामकाज ठप्प
भंडारा : महाराष्ट्र मुद्रांक विक्रेता संघटनेच्या वतीने १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक सुरू ठेवावे तसेच मुद्रांक कमिशन ३ टक्क्यांवरून १० टक्के करावेत किवा सेवा शुल्क ठरवून देण्यात यावे, अशा विविध मागण्यांकरिता ३० ऑक्टोबर रोजी एकदिवसीय संप पुकारला. यामुळे तहसील कार्यालयासमोरील कामकाज ठप्प पडले होते. नागरिकांना आल्यापावली परतावे लागले.
जिल्हा मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखक कायदेशीररीत्या मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मागील काही दिवसापासून शासनाने १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक संपुष्टात आणण्याकरिता प्रस्तावित आहे. प्रस्ताव पारीत झाले तर अनेक मुद्रांक विक्रेता आणि दस्त लेखकांवर उपासमारीची पाळी येणार आहे. त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडणार आहेत.
शासनाने मुद्रांक विक्रेत्यांना सामावून घ्यावे, फर्किंग मशीनद्वारे वा ऑनलाइनद्वारे लागणारे साहीत्य आणि मशीन विनामूल्य उपलब्ध करावेत. मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसाला मुद्रांक हस्तांतरण करून देण्यात यावे तसेच मुद्रांक विक्री कमी झाल्याने मुद्रांक विक्रीचे कमिशन ३ टक्क्यांवरून १० टक्के करावेत. सेवा शुल्क ठरवून देण्यात यावे. अशा विविध मागण्यांकरिता त्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे.
आंदोलनादरम्यान नरेंद्र रामटेके, विलास धोटे, राजू बंसोड, हर्षवर्धन गोस्वामी, दिनेश मडामे, सुखदेवे, रंजीत कोटांगले, प्रदीप हाडगे, पवन मस्के, चंद्रशेखर रामटेके, राजीत सय्यद, योगेश मेश्राम, जैसिक सय्यद, सुचिता बंसोड, विनोद वासनिक, ओमप्रकाश गोंडाणे, सतीशकुमार नागदेवे, कुमार मंगलम बंसोड, शशिकांत नागदेवे व अन्य मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक उपस्थित होते.
विचाराधीन प्रस्ताव मागे घ्यावा
जिल्ह्यात तब्बल ४५०० ते ५००० मुद्रांक विक्रेते व त्याचे कुटुंबीय या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाने १०० व ५०० रूपये मुद्रांक विक्री बंद करू नये, आम्हाला बेरोजगार करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शासनाचे विचाराधीन असलेला प्रस्ताव तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी एकदिवसीय कामबंद आंदोलन मुद्रांक विक्री आणि दस्त लेखकांनी केले आहे.