एक दिवस तरुणांना सरपंचाच्या खुर्चीत बसण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:59+5:302021-08-13T04:39:59+5:30
मोहाडी : तुम्हाला अनिल कपूरचा नायक चित्रपट आठवतोय का? त्यात तो एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्याचे तुम्ही पाहिलं असेल. ...
मोहाडी : तुम्हाला अनिल कपूरचा नायक चित्रपट आठवतोय का? त्यात तो एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्याचे तुम्ही पाहिलं असेल. तो झाला सिनेमा. पण हरदोली (झंझाड) ग्रामपंचायत प्रत्यक्षात एक कल्पना राबवीत आहे. त्यामुळे गावातील तरुणाला सरपंचपदाच्या खुर्चीत बसण्याची एक दिवस संधी मिळणार आहे.
ग्रामपंचायत म्हटले की, त्यात गावातील ज्येष्ठ राजकारण्यांचा भरणा असतो. गावातील अनेक तरुण-तरुणींना संधी मिळत नाही. त्यासाठी गावातील तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. राजकारणातून समाजकारण करण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यांना प्रशासकीय कामाची जवळून माहिती व्हावी. गावातील तरुण-तरुणींच्या कल्पनांना वाव मिळावा. त्यांनासुद्धा ग्रामपंचायतीची कार्यपद्धती समजावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे. गावातील तरुण-तरुणींची निवड करून त्यांच्याकडे एका दिवसासाठी गावाचा कारभार सोपविला जाणार. तसेच प्रत्यक्षात निर्णयप्रक्रियेत काम करायची संधीदेखील दिली जाणार आहे.
हरदोली ग्रामपंचायत उपक्रमशील ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मुलींच्या जन्माचे स्वागत, मुलींच्या आईंना पुरस्कार, सर्वधर्मीय विवाह सोहळा, करदात्यांना मोफत दळण, मुलींच्या हस्ते ध्वजारोहण, मुलींसाठी कुस्तीचे प्रशिक्षण, आदी नावीन्यपूर्ण उपक्रम हरदोली ग्रामपंचायतीने राबविले आहे. आता, एक दिवसाचा सरपंच हा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम घेण्यासाठी १० ऑगस्टच्या मासिक सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रयोग जिल्ह्यात पहिल्यांदाच होत आहे. जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे सरपंच सदाशिव ढेंगे यांनी पुन्हा एका उपक्रमात भर घातली आहे.
बॉक्स
अशी होणार निवड
या उपक्रमात भाग घेण्यासाठी युवक-युवती ग्रामसभेची सभासद असावी. त्यांचे वय १८ ते २५ असावे. त्यांचे शिक्षण किमान दहावी पास असावे. लॉटरी पद्धतीने सर्वांसमक्ष एक दिवसाचा सरपंच निवडला जाईल.
बॉक्स
गांधी जयंतीचा मुहूर्त
या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी २० ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा. त्यातून एका तरुणाची २ ऑक्टोबरला गांधी जयंतीला निवड करून त्याच्याकडे एका दिवसाचा सरपंचपदाचा कारभार सोपविला जाणार आहे.
कोट -
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता यावी. ग्रामपंचायत कारभार कसा चालतो जनतेला कळावा म्हणून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.
गोपाल बुरडे
ग्रामसेवक, हरदोली
कोट
गावातील युवा वर्गाचा ग्रामपंचायतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा. युवकांमध्ये असलेल्या कल्पना, सूचना, गावाच्या विकासात हातभार लागावा या उद्देशाने संकल्पना राबविण्यात येत आहे.
सदाशिव ढेंगे
सरपंच हरदोली
120821\img-20210810-wa0089.jpg
एक दिवस तरुणांना सरपंचाच्या खुर्चीत बसण्याची संधी
हरदोली ग्रां.पं.चा उपक्रम :मासिक सभेत ठराव