एक अभियंता निलंबित, दुसऱ्यावर शिस्तभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:28 AM2019-07-26T01:28:42+5:302019-07-26T01:29:23+5:30
बेशिस्त वागणूक व कामात हलगर्जीपणाच्या मुद्यावरून महावितरणच्या दोन अभियंत्यापैकी एका अभियंत्याचे निलंबन, तर एका अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. याशिवाय तीन तंत्रज्ञांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी बुधवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बेशिस्त वागणूक व कामात हलगर्जीपणाच्या मुद्यावरून महावितरणच्या दोन अभियंत्यापैकी एका अभियंत्याचे निलंबन, तर एका अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. याशिवाय तीन तंत्रज्ञांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी बुधवारी दिले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत अधीक्षक अभियंत्यांनी खोलापूर, वलगाव, अंजनगाव, पथ्रोट आणि दर्यापूर येथे आकस्मिक भेट देऊन प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून पथ्रोट व खोलापूर येथील ग्राहकांशी संवाद साधला. त्यांच्या वीज बिलांविषयक तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले. यावेळी पथ्रोट येथील सताड उघडे रोहित्र तसेच शेतात वाकलेल्या विद्युत पोलवर दुरुस्तीचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. महावितरणचा बहुतेक लाइन स्टाफ हा बाहेरगावी राहतो. संबंधित शाखा अभियंत्यांनी लक्ष देऊन नेमून दिलेल्या ठिकाणी न राहणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी निर्देश दिले. तीन तंत्रज्ञांवर बडतर्फीच्या कारवाईचे आदेश यावेळी त्यांनी दिले. यामध्ये दर्यापूर ग्रामीणचे दोन व खोलापूरचे एक अशा तिघांचा समावेश आहे. बेशिस्त वागणूक, ग्राहकांची दखल न घेणे, मद्यपान करून कार्यालयात येणे असे त्यांच्यावर आक्षेप आहेत. पथ्रोट येथील तत्कालीन सहायक अभियंत्यांनी सदोष मीटर बदलविताना ग्राहकांना झालेला त्रास व कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता कार्यालयात पाठविण्याचे तसेच खोलापूरच्या सहायक अभियंत्यावर बेशिस्त वागण्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देशही संबधित वरिष्ठ अधिकाºयांना खानंदे यांनी दिले.
कामात सतत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी वीज कर्मचाºयांवर कारवार्इंचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. अशी वागणूक देणाऱ्यांची नावे ग्रामस्थ व महावितरणच्या इतर अधिकाऱ्यांनी कळवावीत.
दिलीप खानंदे,
अधीक्षक अभियंता अमरावती
या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
खोलापूरचे तत्कालीन सहायक अभियंता ठाकूर यांच्यावर शिस्तभंग, तर पथ्रोट येथील सहायक अभियंता इरपाते यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत. दर्यापूर येथील तंत्रज्ञ रवि मारेकर, दीपक तायडे आणि खोलपूर येथील तंत्रज्ञ संजय तिरपुडे यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.