वाहनांच्या रांगातून त्रिमूर्ती चौकात शोधावा लागतो मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 05:48 PM2023-05-10T17:48:26+5:302023-05-10T17:49:05+5:30
त्रिमूर्ती चौकात मुख्य शासकीय कार्यालये आहेत. येथे सभा, मोर्चा, धरणे आंदोलने होत असतात.
- देवानंद नंदेश्वर
भंडारा : शहराची लाेकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या तसेच अन्य गावांतून व शहरांतून रोजगार व कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच महामार्गावर असलेल्या शहरातील अत्यंत वर्दळीचा त्रिमूर्ती चौक अजून किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुंद चौकात वाहनांचा भरधाव वेग व वाहतूक कर्मचाऱ्याची थोडीशीही चूक जिवावर बेतू शकते. अपघात ही बाब नित्याचीच झाली आहे.
त्रिमूर्ती चौकात मुख्य शासकीय कार्यालये आहेत. येथे सभा, मोर्चा, धरणे आंदोलने होत असतात. येथूनच बसस्थानक व कॉलेज मार्ग आहे. अपघात थांबविण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणतीही ठोस व्यवस्था उभारलेली दिसत नाही. सिग्नल असूनही ते फक्त शोभेचे ठरले आहे. या धोक्याच्या चौकातून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
शहरातील अत्यंत धोकादायक व वर्दळीच्या चौकात महामार्गावरील जड वाहतुकीमुळे नेहमी अपघात घडत असतात. रस्त्यांच्या कडेला फूटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. बस व ऑटोचा थांबा आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यातून नेहमीच वाहतूक पोलिसांची दमछाक होते. दोन वाहतूक पोलिस सदैव तैनात असतात. तीन दिवसांपूर्वीच महामार्गाच्या कडेवरील अतिक्रमण काढण्यात आले. परंतु त्यामुळे रस्ता मोठा होणार नाही. रस्त्याच्या कडेला पाच ते सहा दशकांपासूनचे विशालकाय वृक्ष आहेत. नागपूर, पवनी, लाखनी येथून येणारे नागरिक शहरात प्रवेश करताना त्रिमूर्ती चौकातील रस्त्यांचा अधिक वापर करतात.
महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच
त्रिमूर्ती चौकातून ये-जा करताना महामार्ग ओलांडावाच लागतो. मात्र महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक काेंडी नित्याची आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची नेहमीच दमछाक होताना दिसून येते. शहराचा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे नेहमी आवागमन असते. मात्र समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना केली जात नाही.
ही आहेत अपघातांची कारणे
- सायंकाळी शाळा व शासकीय कार्यालय तसेच असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगारांची सुट्टी झालेली असते.
- प्रत्येकजण घाईत असतो. वाहन पुढे दामटण्याच्या नादात हमखास अपघात होतो. वेगावर नियंत्रण नसते.
- रात्रीचा अंधार, रस्त्यावरील खड्डे, मद्यपान करून वाहन चालविण्याची सवय.
- बेशिस्त वाहतूक, नियमांचे पालन न करणे, हेल्मेट व सीटबेल्ट न बांधणे.
- ओव्हरटेक तसेच जड वाहतूकही अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.