२१ गावांमध्ये शंभर टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:46+5:302021-09-10T04:42:46+5:30

भंडारा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, गावागावांमध्ये लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यातील २१ गावांमधील ...

One hundred percent of the citizens in 21 villages took the first dose of the vaccine | २१ गावांमध्ये शंभर टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

२१ गावांमध्ये शंभर टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

Next

भंडारा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, गावागावांमध्ये लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यातील २१ गावांमधील १०० टक्के ग्रामस्थांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रभावीपणे मोहीम राबवली. या मोहिमेचे हे यश होय.

भंडारा जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. आतापर्यंत ८ लाख ६६ हजार ८२७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ७६ हजार ७०० तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९० हजार २३५ आहे. जिल्ह्यातील २१ गावांमधील शंभर टक्के ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे. त्यात भंडारा तालुक्यातील लोहारा, पेवठा, मोहाडी तालुक्यातील किसनपूर, कांद्री, वासेरा, तुमसर तालुक्यातील महालगाव, रेंगेपार, लाखनी तालुक्यातील घोडेझरी, कोलारा, खराशी, भूगाव, कोलारी, सोमनाळा, साकोली तालुक्यातील वलमाझरी, मालूटोला, सालई, लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, दहेगाव, मासळ, पुयार आणि पवनी तालुक्यातील गोसे गावाचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. माधुरी माथुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच हे यश मिळाले आहे. नागरिकांनी तत्काळ लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेच्यावतीने लसीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ७६ हजार

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असून, ९ लाख ६५ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ७६ हजार ७०० होती तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९० हजार २३५ आहे. त्यात पुरुषांची संख्या ४ लाख ३० हजार ४ तर महिलांची संख्या ४ लाख ३६ हजार ८२३ आहे.

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटात ५८ हजार ५२८ जणांनी, ४५ ते ५९ वयोगटात २ लाख ४८ हजार १६९ जणांनी, ६० वर्षावरील २ लाख ११ हजार ५५९ व्यक्तींनी लस घेतली आहे. आरोग्य विभागातील २० हजार ४९७ आणि फ्रन्टलाईन वाॅरियर असलेल्या २८ हजार २१० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. कोव्हॅक्सिन लसीचे ३ लाख ७७ हजार ९३९ डोस तर कोविशिल्डचे ४ लाख ८८ हजार ९९६ डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत.

Web Title: One hundred percent of the citizens in 21 villages took the first dose of the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.