भाविकांची स्कार्पिओ उलटून एक ठार, नऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:39 AM2021-09-22T04:39:26+5:302021-09-22T04:39:26+5:30
घाशीराम धनेश साहू (वय ६०) रा. साखरी (छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कमलेश ताम्रकार (४८), गुलाब ताम्रकार (६६), ...
घाशीराम धनेश साहू (वय ६०) रा. साखरी (छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कमलेश ताम्रकार (४८), गुलाब ताम्रकार (६६), बदरून नेताम (६५), नारायण श्रीवास (६५), भरोसा सिन्हा (५८), कन्हैया हुबेकर (६६), छबिलाल शाहू (६०) आणि चालक राजू ताम्रकार (४०) अशी जखमींची नावे आहेत. आठ दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यातील साखरी येथील दहाजण स्कार्पिओने देवदर्शनासाठी गेले होते. शेगाव, शिर्डीमार्गे जयपूर, जोधपूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात असताना साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगल शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले. एका मोठ्या खड्ड्यातून स्कार्पिओ उसळून उलटले. चारही चाके वर झाल्याने अपघातात घाशीराम जागीच ठार झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आलेली. ठाणेदार जितेंद्र बोरकर पथकासह घटनास्थळी पोहोचले. जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणले.
बॉक्स
आठवडाभरात दुसरा बळी
साकोली येथे दुचाकीने परत येत असताना प्रा. प्रोफेसर बहेकार यांचा भीषण अपघात झाला होता. एका खड्ड्यातून त्यांची दुचाकी उसळल्याने ते खाली काेसळले आणि त्याचवेळी त्यांच्या अंगावरून ट्रक गेला. ट्रकखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मंगळवारी पुन्हा खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात एका भाविकाचा मृत्यू झाला. प्राध्यापकाच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग आली नाही. आठवडा लोटला तरी महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यावरील खड्डे बुजविले नाही. कदाचित खड्डे बुजवले असते तर स्कार्पिओचा अपघात टाळू शकता आला असता.