राजापूर जंगलाचा एक किमी परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:49 PM2019-02-24T22:49:00+5:302019-02-24T22:49:14+5:30
नाकाडोंगरी वनविभागांतर्गत राजापूर राखीव जंगलात लागलेल्या आगीत एक कि.मी. परिसर भक्ष्यस्थानी सापडल्याचे दिसून येत आहे. या आगीचे कारण गुलदस्त्यात असले तरी तेंदूपत्ता फुटव्यांसाठी ही आग लावण्यात आल्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नाकाडोंगरी वनविभागांतर्गत राजापूर राखीव जंगलात लागलेल्या आगीत एक कि.मी. परिसर भक्ष्यस्थानी सापडल्याचे दिसून येत आहे. या आगीचे कारण गुलदस्त्यात असले तरी तेंदूपत्ता फुटव्यांसाठी ही आग लावण्यात आल्याची शक्यता आहे.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत राजापूर जंगलात शनिवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. रात्रीची वेळ असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते. सुमारे एक कि.मी. परिसरात ही आग पसरल्याने अनेक मौल्यवान वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. विशेष म्हणजे या आगीमुळे राजापूर गावालाही धोका निर्माण झाला होता.
नाकाडोंगरी राखीव जंगलात तेंदूपत्ता फुटव्याकरिता लहान झाडे कचरा जाळण्यासाठी आग लावण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच ही आग लागली असावी असा अंदाज आहे. गावापासून एक कि.मी. अंतरावर जंगल धगधगत होते. गावाबाहेर तणसाचे ढिग होते. त्यामुळे धोक्याची शक्यता अधिक होती, अशी माहिती उपसरपंच वसंत बिटलाये यांनी दिली. रात्री घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी फिरकलेही नाही. रविवारी सकाळी नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय व इतर कर्मचारी दाखल झाले. पाहाणी करून कर्मचारी परतले. या संदर्भात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते नॉट रिचेबल होते. सदर राखीव जंगलात मौल्यवान झाडे, वन्यप्राणी आहेत. सातपुडा पर्वतरांगातील हे जंगल आहे. तेंदूपत्त्यासह इतर झाडे मोठ्या संख्येने आहेत. सदर आग तेंदूपत्ता संकलन मोठ्या प्रमाणात व्हावे याकरिता लावण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसचे नेते डॉ.पंकज कारेमोरे यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.