शाळा एक, भरते तीन ठिकाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:06 AM2019-07-21T01:06:45+5:302019-07-21T01:07:20+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते.
विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते. शाळा एक असली तरी वर्ग मात्र तीन ठिकाणी भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. वर्गखोलीचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी पिलांद्री येथील पालकांनी केली आहे.
पवनी तालुक्यातील पिलांद्री येथील शाळा परिसरात नावाजलेली होती. परंतु १९६६ मध्ये बांधलेली ही शाळा आता जीर्ण झाली आहे. डागडुजीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली. त्यातच चार महिन्यापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली छत काढण्यात आले. परंतु पावसाळा सुरु झाला तरी छत टाकण्यासाठी मुहूर्त झाला नाही. त्यामुळे शाळा एक असली तरी तीन ठिकाणी भरविली जात आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृहाचाही अभाव आहे. पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यासाठी घर गाठावे लागते. १२० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेत ज्ञानार्जन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. शाळेत एक संगणक असून या कक्षातही विद्यार्थ्यांना बसविण्याशिवाय पर्याय नाही.
या शाळेची इमारत तीन वर्षापासून आहे त्या अवस्थेत आहे. प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. क्रीडांगण नाही. परिपाठासाठी एक खोली आहे. त्या खोलीत १२० विद्यार्थी कसेबसे बसतात. या सर्व प्रकारामुळे विद्याथ् र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जीर्ण झालेल्या शाळेत अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वर्गखोलीचे तात्काळ बांधकाम करावे अशी मागणी सरपंच भारती मडावी व गावकऱ्यांनी केली आहे.
अपघाताची भीती
शाळेच्या जीर्ण इमारतीत १२० विद्यार्थी शिकतात. या शाळेचे छत काढून ठेवण्यात आले आहे. इमारतीच्या भींतीही खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची कायम भीती असते. विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत घेऊन येथे ज्ञानार्जन करताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन या शाळा इमारतीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.
भौतिक सुविधा विषयींचा अहवाल आपण दरवर्षी जिल्हा परिषदेला पाठवितो. दुरुस्तीची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या वतीने शाळांची निवड करून केली जाते.
-एन.टी. टिचकुले, गटशिक्षणाधिकारी, पवनी.