कारच्या धडकेने एकाचा सिक्युरिटी गार्डचा मृत्यू; धोप शिवारातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2023 20:46 IST2023-09-23T20:45:06+5:302023-09-23T20:46:12+5:30
आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल.

कारच्या धडकेने एकाचा सिक्युरिटी गार्डचा मृत्यू; धोप शिवारातील घटना
देवानंद नंदेश्वर, भंडारा : कर्तव्य बजाऊन शेताची पाहणीसाठी जात असलेल्या ५३ वर्षीय सिक्युरिटी गार्डला भरधाव वेगात असलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास तुमसर- रामटेक महामार्गावरील धोप (नागठाणा) शिवारात घडली. सुनील हरिभाऊ सपाटे (५३, रा. धोप, ता. मोहाडी), असे मृताचे नाव आहे.
सुनील सपाटे हे तुमसर जवळील खमाटा येथील कंपनीत सिक्युरिटी गार्ड आहेत. रात्रपाळीचे काम करून नागठाणा शिवारा जवळील शेताजवळ तुमसर आगाराच्या रामटेककडे जाणाऱ्या बसने उतरले. त्यानंतर शेताची पाहणीसाठी जात असताना तुमसरकडून रामटेक कडे धावणाऱ्या भरधाव मारुती सुझुकी स्विफ्ट कार क्रमांक एमएच ४९ बी ८००२ च्या चालकाने सुनील सपाटे यांना जबर धडक दिली. कार चालकाने जखमीला रामटेक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून पसार झाला. सुनील सपाटे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा आप्त परिवार आहे. घटनेची नोंद आंधळगाव पोलिसांनी केली आहे. तपास ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार,श्रीकांत पुडके, नामदेव बळदे करीत आहेत.