विवाह सोहळ्यातून एकोप्याचे दर्शन
By admin | Published: April 12, 2016 12:42 AM2016-04-12T00:42:22+5:302016-04-12T00:42:22+5:30
क्षुल्लक कारणातून समाजात जातीय तेढ निर्माण होते.
नाना पटोले यांचे प्रतिपादन : डोंगरला येथे माळी समाजाचा विवाह सोहळा, संसारोपयोगी साहित्यांचे वाटप
भंडारा : क्षुल्लक कारणातून समाजात जातीय तेढ निर्माण होते. अशा स्थितीत समाजाला एकत्र आणण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा आता काळाची गरज ठरली आहे. यातून समाजबांधव एकत्र येतात. यामुळे समाजातील एकोपा दिसून येते, अशी प्रतिक्रिया खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.
तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे महात्मा जोतिबा फुले बहुउद्देशीय विकास मंडळाच्या वतीने रविवारला सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला खासदार नाना पटोले यांच्यासह आमदार चरण वाघमारे, तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, भंडाराचे नगराध्यक्ष बाबु बागडे, माजी आ. मधुकर कुकडे, अनिल बावनकर, बंडू बनकर, शंकर राऊत, तारिक कुरैशी, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रकाश हटाळकर, राजेंद्र पटले, अॅड. रविकिरण भुसारी, सीमा भुरे, परसराम आंबेकर, नामदेव कांबळे, शंकर कांबळे, सुभाष राऊत, जोशी नेरकर, किशोर मांदाळे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी माळी समाज बांधव हा पारंपरिक व्यवसायात गुुंतला आहे. स्वत:सह समाजाच्या उत्थाणासाठी समाज बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. यातून प्रगती साधून आर्थिक उन्नती करावी. राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. ही चिंताजनक बाब असून सर्व शेतकरी बांधवांनी आत्महत्या करण्याऐवजी शेतीतून उत्पादन प्रक्रियेकडे लक्ष देण्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
आमदार चरण वाघमारे यांनी, समाजातील तळागाळातील बांधवांना एका धाग्यात बांधण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा आदर्श निर्माण करीत आहो. यातून वधू व वरांच्या पालकांची आर्थिक बचत होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
मागील नववर्षापासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या सोहळ्यात जिल्ह्यासह मध्य प्रदेशातीलही युवक विवाह बंधनात अडकलेत. या कार्यक्रमात नव जोडपे विवाहबद्ध झाले. विवाहानंतर मान्यवरांच्या हस्ते नवदांम्पत्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)