नाकाडोंगरी येथील वनक्षेत्र सहायकाला एक वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 10:52 PM2019-03-01T22:52:32+5:302019-03-01T22:52:49+5:30
सागवान फर्निचर जप्त प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी वीस हजार रूपयाची लाच घेणाऱ्या वनक्षेत्र सहायकाला भंडारा येथील विशेष न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. तीन वर्षापुर्वी नाकाडोंगरी वनउपज नाक्यावर लाच स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सागवान फर्निचर जप्त प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी वीस हजार रूपयाची लाच घेणाऱ्या वनक्षेत्र सहायकाला भंडारा येथील विशेष न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. तीन वर्षापुर्वी नाकाडोंगरी वनउपज नाक्यावर लाच स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले होते.
सैय्यद शकील सैय्यद सलाम (५५) असे शिक्षा झालेल्या वनक्षेत्र सहायकाचे नाव आहे. तो तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनउपज तपासणी नाक्यावर कार्यरत होता. डोंगलसिंग जंगलुराम यादव रा. डोंगरी याच्या घरी धाड मारून सागवान फर्निचर जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी कोणतीही कारवाई न करण्यासाठी सैय्यद शलीलने वीस हजार रूपयांची लाच मागितली होती. २९ जानेवारी २०१५ रोजी वनउपज तपासणी नाक्यावर वीस हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले होते. त्यावरून गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी केला. मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी मंजुरी दिल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
भंडारा येथील विशेष न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरकारी वकील प्रमोद भुजाडे यांनी यावेळी सरकारपक्षाची बाजू मांडली. न्यायालयाने सदर गुन्ह्यातील साक्षीदारांची पडताळली केली. त्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने सैय्यद शकील याला एक वर्ष कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर खटल्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधिक्षक महेश चाटे, तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, भाऊराव वाडीभस्मे, गणेश पदवाड, रविंद्र गभने, संदीप पडोळे यांनी सहकार्य केले.