सहा महिन्यांपासून ऑनलाइन बीडीएस प्रणाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:40 AM2021-08-25T04:40:04+5:302021-08-25T04:40:04+5:30
भंडारा : राज्यातील शिक्षकांचे ऑनलाइन वेतन करणारी बीडीएस प्रणाली मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत हजारो ...
भंडारा : राज्यातील शिक्षकांचे ऑनलाइन वेतन करणारी बीडीएस प्रणाली मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत हजारो शिक्षक सेवानिवृत्त झाले. मात्र, बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे राज्यातील अनेक सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचा एक नवा पैसाही मिळाला नाही. त्यामुळे ऑनलाइन बीडीएस प्रणाली तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन दिले आहे.
राज्यातील खासगी अनुदानित, तसेच नगरपालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे नियमित वेतन ऑनलाइन शालार्थ प्रणालीद्वारे होतात. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी परतावना/परतावा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रदान रक्कम देयकेही ऑनलाइन बीडीएस प्रणालीद्वारे मंजूर केली जातात.
मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून ऑनलाइन बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे हजारो शिक्षकांची भविष्य निर्वाह निधी देयके कार्यालयात पडून असल्याने, सेवानिवृत्त शिक्षकांना स्वतःचीच जमा असलेली पुंजी खर्च करण्यावर मर्यादा आल्या आहेत.
या सहा महिन्यांचा कालावधीत अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सेवानिवृत्त झाले. मात्र, त्यांच्या हक्काची भविष्य निर्वाह निधी अंतिम रक्कम अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असून, शासनाने सेवानिवृत्तीनंतर तरी शिक्षकांची थट्टा करू नये, असा विमाशिने सवाल केला आहे. यासोबतच मुलांचे लग्न समारंभ, उच्चशिक्षण, घर, फ्लॅट दुरुस्ती अथवा डागडुजीकरिता अनेक कार्यरत असलेल्या शिक्षकांनी भविष्य निर्वाह निधी परतावा व ना परतावा रक्कम मिळणेकरिता प्रस्ताव सादर केले आहे. मात्र, बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे आपलाच हक्काचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली आहे.
त्यामुळे शिक्षकांची आर्थिक गैरसोय लक्षात घेता, ऑनलाइन बीडीएस प्रणाली तत्काळ सुरू करण्याची मागणी विमाशीचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, भंडाराचे जिल्हाकार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, पुरुषोत्तम लांजेवार, जागेश्वर मेश्राम, मनोज अंबादे, धिरज बांते, पंजाब राठोड, अनंत जायभाये इत्यादींनी केली आहे.
कोट बाॅक्स
राज्यातील अनेक सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना बंद असलेल्या बीडीएस प्रणालीमुळे आपल्याच हक्काच्या पैशापासून वंचित राहावे लागते, ही बाब अतिशय खेदजनक आहे. त्यामुळे बीडीएस प्रणाली सुरू करून, कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असलेला असंतोष शासनाने दूर करावा.
सुधाकर अडबाले, सरकार्यवाह, विमाशी.