व्यावसायिक अभ्यासक्रमाला ऑनलाईनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:00 AM2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:22+5:30
जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नववी व दहावीसाठी व्यवसायिक शिक्षण विषय हा मुख्य विषयांपैकी एक असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून होत आहे. केंद्र व राज्य शासनाची माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण योजना ही समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यामध्ये २०१५ पासून राबविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत चालल्याने शाळा महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले. मात्र शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरही चार महिने लोटले तरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच विविध संस्थेच्या शाळांमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाचे वर्ग भरत नसल्याने विद्यार्थ्यांचे अनेक दिवसापासून शैक्षणिक नुकसान होत आहे.
जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नववी व दहावीसाठी व्यवसायिक शिक्षण विषय हा मुख्य विषयांपैकी एक असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून होत आहे. केंद्र व राज्य शासनाची माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण योजना ही समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यामध्ये २०१५ पासून राबविली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी याचा फायदा झाला आहे. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे अद्यापह अनेक शाळेत व्यवसायिक शिक्षण सुरु झाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला शासनच जबाबदार ठरणार आहे, असे पालकांतून बोलले जात आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यात ५२४ पेक्षा अधिक शासकीय शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरु करण्यात आले आहे. राज्यातील एक हजार १०० शिक्षकांना या विषयाच्या दिरंगाईचा कारभाराचा फटका बसत असून गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन मिळालेले नाही. राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेमार्फत हे शिक्षक कार्यरत असून या शिक्षकांना अद्यापही यावर्षी पुर्ननियुक्ती देण्यात आलेली नाही.
मागील पाच वर्षापासून जिल्हा परिषद शाळामध्ये सुरु असलेल्या या व्यवसायिक शिक्षणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे सध्या शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसाय शिक्षण शासनाने सुरु ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
- डी. आर. हटवार, मुख्याध्यापक, जकातदार विद्यालय, भंडारा
गत सहा महिन्यापासून आम्हचे वेतन बंद झाले असून सुध्दा आम्ही दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणीचे काम पुर्ण केले. आजही शाळेच्या विविध कामात मदत करीत आहोत. त्यामुळे शासनाने आम्हाला पुर्ननियुक्त तात्काळ द्यावी.
- सचिन कोठे, व्यवसाय शिक्षक