ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइलने लावला मुलांना चश्मा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:40+5:302021-07-18T04:25:40+5:30
भंडारा : गत मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून, तेव्हापासून शाळा बंद आहेत. मुलेही घरातच आहेत. यामुळे त्यांना घरातच ...
भंडारा : गत मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून, तेव्हापासून शाळा बंद आहेत. मुलेही घरातच आहेत. यामुळे त्यांना घरातच आपला विरंगुळा म्हणून मोबाइल, कॉम्प्युटर आणि टीव्ही हीच साधने उरली आहेत. त्यात शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्या, तरीही ऑनलाइन शिक्षणाने त्याची जागा घेतली असून, यामुळे मुलांना क्लासेससाठी मोबाइलवर लागून राहावे लागत आहे. यामुळे आता मात्र त्यांना डोळ्यांची समस्या जाणवू लागली आहे, शिवाय घराबाहेर जाता येत नसल्याने ते दिवसभर मोबाइलवर गेम खेळतात. मोबाइल लागून राहात असल्याने, मुलांना डोळ्यांचा थकवा, डोकेदुखी व चश्मा लागणे आदी त्रास होत आहेत. कित्येक मुलांना लहानपणापासूनच चश्मा लागत असल्याचे दिसत असून, यामुळेच आता मुलांच्या या समस्या पालकांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. अशात यावर वेळीच आपल्या डॉक्टरांशी बोलून उपचार करण्याची गरज आहे.
कोट
सतत मोबाइल, कॉम्प्युटर किंवा टीव्हीसमोर बसून असल्याने, लहान मुलांमध्ये डोळ्यांचा त्रास वाढत आहे. यासाठी सतत मोबाइलवर लागून न राहता, मध्येच डोळे बंद करून ठेवावे किंवा उघड-बंद करावे. ज्यांना चश्मा आहे, त्यांनी अँटिग्लेअर ग्लासेस लावावे किंवा लॅपटॉप असल्यास त्याला अँटिग्लेअर ग्लास लावावे, तरीही त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ.आशा लांजेवार, नेत्ररोग तज्ज्ञ, भंडारा.
बॉक्स
पालकही चिंतेत
कोरोनामुळे मागील वर्षापासून मुले घरातच असून, त्यांना बाहेर जाणे बंद केले आहे. अशात दिवसभर घरात राहून ते वैतागल्याने सतत मोबाइल, टीव्ही व कॉम्प्युटरवर लागून असतात. त्यात आता शाळा बंद असल्याने ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास सुरू आहे. म्हणजेच, त्यासाठीही सतत मोबाइलवर लागून राहावे लागत आहे. यामुळे मात्र मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या आता वाढत आहेत.
- बाबुलाल वासनिक
कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हापासून शाळा बंद आहेत, शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे लहान मुलांना घराबाहेर जाऊ देण्यावर बंदी लावण्यात आली आहे. यामुळे ते घरातच असून, मोबाइल व टीव्हीवर आपला दिवस घालवतात. आता ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्याने, त्यांना मोबाइलवरच शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे मात्र त्यांना डोळ्यांचा थकवा, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे यांसारख्या समस्या जाणवत आहेत.
- शरद भुते