रबीचा केवळ १० टक्के पीक विमा
By admin | Published: January 23, 2017 12:16 AM2017-01-23T00:16:12+5:302017-01-23T00:16:12+5:30
जिल्ह्यात ४६ हजार १५७ हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली.
१ हजार ७७२ शेतकऱ्यांचा सहभाग : ४६ हजारांपैकी ४,२१६ हेक्टरवरील पिकांचा समावेश
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यात ४६ हजार १५७ हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. या पिकांना सुरक्षेचे कवच मिळावे म्हणून रबी हंगाम २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. जिल्ह्यातील ४ हजार २१६ हेक्टर रबी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात १ हजार ७७२ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
जिल्ह्यात आॅक्टोंबर २०१६ पासून रबीची पेरणी करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर संभाव्य नैसर्गिक आपत्ती, कीड व अळींचा हल्ला, उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान आदी बाबींमध्ये रबी पिकांना सुरक्षा मिळावी, तसेच शेतकऱ्यांना त्याची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टिकोणातून जिल्ह्यात पीक विमा योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर घोषित करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांकडून योजनेस अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती.
प्राप्त अहवालानुसार, पीक विमा योजनेत सहभाग नोंदवित जिल्ह्यातील सातही तालुक्यातील १ हजार ७७२ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत ३ लाख ९८ हजार ५६२ रुपयांचा हप्ता भरला आहे. यातून ४ हजार २१६ हेक्टर रब्बी क्षेत्र सुरक्षित झाले आहे. एकूण क्षेत्रापैकी केवळ १० टक्के याचे प्रमाण आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक अग्रेसर
रबी हंगाम २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. जिल्ह्यातील ४ हजार २१६ हेक्टर रबी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात १ हजार ७७२ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
सर्वाधिक १,४५५ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सहभाग नोंदवून अव्वल स्थान पटकाविला आहे. त्याच बरोबर अलाहाबाद बँकेत १७८ शेतकरी, आंध्रा बँक ९, बँक आॅफ इंडीया १८, कॅनरा बँक ८४, पंजाब नॅशनल बँक २२, युनियन बँकेत ०५ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.