२३ दिवसांत केवळ ११ टक्के पाऊस

By admin | Published: June 24, 2016 01:12 AM2016-06-24T01:12:31+5:302016-06-24T01:12:31+5:30

रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करुन नव्या जोमाने लागून चांगले उत्पन्न होईल, कर्जाचा भार कमी होईल.

Only 11 percent of the rain during 23 days | २३ दिवसांत केवळ ११ टक्के पाऊस

२३ दिवसांत केवळ ११ टक्के पाऊस

Next

पावसाच्या हुलकावणीने शेतकरी संकटात : हवामान खात्याचा अंदाज चुकला, मागीलवर्षी २५५ मि.मी. पावसाची नोंद
भंडारा : रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करुन नव्या जोमाने लागून चांगले उत्पन्न होईल, कर्जाचा भार कमी होईल. या हेतूने कामाला लागलेल्या शेतकऱ्यांना सुरूवातीलाच निराशेला सामोरे जावे लागत आहे.
मृग नक्षत्र कोरडा गेला. मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल, अशी भाबडी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची पावसाने घोर निराशा केली आहे. मृग नक्षत्रात बियाणांची पेरणी केली तर उत्पन्न जास्त येते, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणाची लागवड केली. परंतु अनुकूल पाऊस न झाल्याने पेरणीला वेग आला नाही. ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे.
भूतकाळातील कटू आठवणी विसरून नवे स्वप्न उराशी बाळगून येणारे दिवस ‘अच्छे दिन’ च्या रूपात समाधानाने जातील. संकटातील शेतकऱ्याला यावर्षी तरी दिलासा मिळेल असे वाटत असले, तरी पावसाची वाट पाहण्याखेरीज शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही.
पूर्वीच्या नापिकीमुळे झालेले कर्जाचे ओझे विसरून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. त्यानंतर पैशाची जुळवाजुळव करून बियाणे खरेदी केले. परंतु सुरूवातीपासूनच निसर्ग हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळून पडले आहे. पेरणीला पाणी न मिळाल्याने यावर्षीही दुष्काळ पडेल का? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

हवामान खात्याचा अंदाज चुकला
सुरूवातीला हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवित मान्सून वेळेवर येण्याचे भाकित केले होते. मात्र हवामानातील बदलाने मान्सूनची गती मंदावली. परिणामी रोहिणीतील हलक्या पावसानंतर मृग नक्षत्र कोरडे गेले. धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसून येत आहे. हवामान खातेही दररोज वेगवेगळा अंदाज वर्तवित असल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे.

केवळ १७.२ मि.मी. पाऊस
भंडारा जिल्ह्यात पावसाची सरासरी १३३०.२० मि.मी. इतकी आहे. सन २०१४ चा अपवाद वगळता ईतका पाऊस मागील पाच वर्षात पडला नाही. यावर्षी पावसाने दगा दिला आहे. २३ जूनपर्यंत १५० मि.मी. पावसाची सरासरी असताना यावर्षी केवळ १७.२ मि.मी. म्हणजे केवळ ११ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. सन २०१४ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती.

Web Title: Only 11 percent of the rain during 23 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.