जिल्ह्यात केवळ १२३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:09+5:302021-06-18T04:25:09+5:30
भंडारा : जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून गुरुवारी जिल्ह्यात केवळ १२३ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. बहुतांश तालुक्यात ॲक्टिव्ह ...
भंडारा : जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून गुरुवारी जिल्ह्यात केवळ १२३ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. बहुतांश तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २० च्या आत आहे. दरम्यान, गुरुवारी ८ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून १४ कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गत १५ दिवसांपासून कोरोनाचा कुणीही बळी गेला नाही.
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील कोरोना हाहाकारानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. गत १५ दिवसांपासून रुग्णांची संख्या सिंगल डिजिटमध्ये येऊ लागली आहे. तर, बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने कमी हो. आहे. गुरुवारी १२३ रुग्ण उपचाराखाली होते. त्यात भंडारा तालुक्यात ४१, साकोली २४, मोहाडी ११, तुमसर ९, पवनी १२, लाखनी १८ आणि लाखांदूर तालुक्यात ८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ३३५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या होत्या. त्यापैकी ५८ हजार १५७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर १०५५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
बाॅक्स
पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या सिंगल डिजिटमध्ये
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. १० च्या आतच रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी भंडारा तालुक्यात १, मोहाडी ३, लाखनी २, साकोली १, लाखांदूर १ आणि पवनी व तुमसर तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. विशेष म्हणजे १००६ व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर केवळ ८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत.