प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:09 PM2018-04-03T22:09:27+5:302018-04-03T22:09:27+5:30
अत्यल्प पर्जन्यमानामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रकल्पातील जलसाठ्यात १२ टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या ६३ प्रकल्पांमध्ये केवळ १४.५६ टक्के जलसाठा आहे. परिणामी, येत्या काळात रणरणत्या उन्हात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अत्यल्प पर्जन्यमानामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रकल्पातील जलसाठ्यात १२ टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या ६३ प्रकल्पांमध्ये केवळ १४.५६ टक्के जलसाठा आहे. परिणामी, येत्या काळात रणरणत्या उन्हात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
भंडारा जिल्ह्यात सरासरी १,३३० मि.मी. पाऊस बरसतो. यावरच सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही अवलंबून असतो. दुसरीकडे भूजलाची पातळी सातत्याने घसरत असल्याने पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत ७.५१ टक्के जलसाठा आहे. यात मोहाडी तालुक्यातील सोरणा मध्यम प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे.
याशिवाय चांदपूर जलाशयात ८.६४ टक्के, बघेडा १२.६२ टक्के तर बेटेकर (बोथली) प्रकल्पात ४.७७ टक्के जलसाठा आहे. उन्हाळयाला प्रारंभ झाला असून आणखी तीन महिने ऊन्ह तापणार असून या प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात आजघडीला पाणी टंचाईचे सावट आहे. माजी मालगुजारी तलावांसह अन्य लहानमोठ्या तलावांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष, पाण्याचा अपव्यय व जल पुर्नभरणाकडे दुर्लक्ष होत गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात आता अवर्षणाची चिन्हे दिसू लागली असून पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी शेती कसण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मनाई केली होती.
भंडारा शहर ते गोसेखुर्द धरणापर्यत वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी आहे. मात्र या पाण्याच्या सदुपयोगाकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील गावांनाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जलशुद्धीकरणासाठी निधीची बोंब कायम आहे. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.
परिणामी, जिल्हा प्रशसानाने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे पिण्याच्या पाण्याचे संकट व अवर्षण स्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील २०१ गावांपैकी १३१ गावे १०० टक्के ‘वॉटर न्युट्रल’ झालेली आहेत. मात्र या ‘वॉटर न्युट्रल’ गावांमध्येही पिण्याच्या पाण्याची ओरड असून यावर्षी पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे.
जनावरांनाही भेडसावणार पाणी टंचाई
यावर्षीच्या पाणी टंचाईची झळ नागरिकांना बसणार आहे. परंतु जनावरांनाही पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आधीच पशुधन घटलेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा पशुधन घटण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या २८ जुने मालगुजारी तलावांमध्ये २०.४० टक्के पाणी उपलब्ध आहे.
मे महिन्यात पाणी टंचाईचे सावट
दरवर्षी होणारा अत्यल्प पाऊस आणि जलसाक्षरतेचा अभाव आदी कारणामुळे तलावांचा भंडारा जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईची झळ बसत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ६५३ गावात पाणीटंचाईचे सावट असून तिसºया टप्प्यात २६४ गावात जलसंकटाची परिस्थिती राहण्याची शक्यता भूजल सर्व्हेक्षण विभागाने वर्तविली आहे.