६३ प्रकल्पांत केवळ १६ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:35 PM2018-02-09T22:35:22+5:302018-02-09T22:36:05+5:30
थंडी कमी जाणवू लागली आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली असून जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : थंडी कमी जाणवू लागली आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली असून जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १६ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात १४ टक्क्यांनी घट झालेली आहे.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ९, बघेडा ७२.७६, बेटेकर बोथली ८.४३ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक दाखविण्यात आला आहे़ जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत.
जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.४२ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा २१.४५ टक्के आहे़
जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी.
पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़
जनावरे व वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा
जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ २५.१९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी जानेवारी महिन्यात ६३ प्रकल्पांमध्ये ४३.७५६ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ३५.९४ एवढी होती. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.