साकोली तालुक्यात केवळ २५ टक्के भात रोवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:24 PM2020-07-17T22:24:20+5:302020-07-17T22:24:48+5:30
साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोना महासंकटाने यंदा साकोली तालुक्यातील रोवणी रखडली आहे. आतापर्यंत केवळ २५ टक्के क्षेत्रावरच रोवणीचे काम आटोपले आहे. सिंचनाच्या सुविधेचा अभाव आणि आर्थिक टंचाईमुळे उर्वरित रोवणी कधी पूर्ण होईल, असा प्रश्न आहे. तर तालुक्यातील दोन प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.
साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.
गतवर्षी सुरूवातीला पाऊस आला आणि नंतर अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फसका बसला. यावर्षी तसेच होवू नये म्हणून शेतकरी सावध पवित्रा घेत आहे. आधीच कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. बि-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी आर्थिक विवंचना अद्यापही आहे. धान विक्रीचे पैसेही शेतकऱ्यांना उशिरा मिळाले. सध्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळणे बाकी आहे. एकीकडे आस्मानी आणि दुसरीकडे सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
आठ तास वीज पुरवठा
सध्या पावसाने दडी मारली आहे. रोवणीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे शेतकºयांनी लगबग वाढली आहे. अनेक शेतकºयांनी सिंचनासाठी आपल्या शेतात विहिरी, बोरवेल खोदून सोय उपलब्ध केली. परंतु वीज पुरवठ्याचा अडसर कायम आहे. शेतकऱ्यांना केवळ आठ तासच वीज पुरवठा होत आहे. त्याचा परिणामही रोवणीवर होत आहे. १६ तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. तसेच कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचीही मागणी होवू लागली आहे. अनेक शेतकरी कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडले आहे.
दोन्ही सिंचन प्रकल्प अपूर्ण
साकोली तालुक्यातील कुंभली येथील निम्न चुलबंध प्रकल्पाचे काम जवळपास २० वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पाचे बहुतेक काम पूर्ण झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. दुसरा प्रकल्प वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्प होय. याप्रकल्पाचे काम २५ वर्षापुर्वी करण्यात आले होते. मात्र २५ टक्के काम शिल्लक असताना हा प्रकल्प वनकायद्याच्या कचाट्यात सापडला. तेव्हापासून हा प्रकल्प रखडलेलाच आहे. निवडणुकीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणत्याच हालचाली दिसत नाही.
साकोली तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. कुठेही खताची टंचाई नाही. शेतकºयांना काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा.
-सागर ढवळे, तालुका कृषी अधिकारी, साकोली.