जिल्ह्यात केवळ ३१ टक्के जलसाठा; मामा तलावांत ठणठणाट

By युवराज गोमास | Published: May 10, 2024 07:53 PM2024-05-10T19:53:10+5:302024-05-10T19:53:32+5:30

मध्यम व लघु प्रकल्प तळाला : जलसंकटाची चाहूल, पाणी वापरा जपून

Only 31 percent water in the district | जिल्ह्यात केवळ ३१ टक्के जलसाठा; मामा तलावांत ठणठणाट

जिल्ह्यात केवळ ३१ टक्के जलसाठा; मामा तलावांत ठणठणाट

भंडारा: जिल्हयातील मध्यम, लघु प्रकल्प तळाला गेेले आहेत. तर जुने मालगुजारी तलावांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सध्यास्थितीत उपयुक्त जलसाठा ३७.८८ दलघमी असून टक्केवारी ३१ टक्के इतकी आहे. परिणामी जिल्ह्यातील गावागावात तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यांपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असतांना प्रखर उन्हाने बाष्पीभवन वेगाने सुरू आहे. परिणामी उकड्यात वाढ झाली आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होवून भटकंती वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली व सोरणा आदी ४ मध्यंम प्रकल्प असून २ मेपर्यंत या प्रकल्पात १६.७७२ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ३९ टक्के आहे. मे व जून महिन्याच्या प्रारंभी प्रकल्पातील जलसाठ्यात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. परिणामी प्रकल्प क्षेत्रातील भागात नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.

जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहेत. यात कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली, नागठाणा, टांगा, हिवरा, आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली-आंबाडी, वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, शिवनीबांध, कुंभली, गुढरी, सालेबर्डी, भूगावमेंढा, मुरमाडी-हमेशा, रेंगेपार-कोठा, न्याहारवानी, वाकल व खुर्शिपार आदी प्रकल्पांचा समावेश आहे. सध्यास्थितीत लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १४.६७५ दलघमी असून टक्केवारी २७.४०९ इतकी आहे. या प्रकल्पापैकी शिवनीबांध, कारली व कवलेवाडा या ३ प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा १ दलघमीपेक्षा अधिक आहे, तर उर्वरीत २८ प्रकल्प तळाला गेले आहे.

२८ मामा तलावाची स्थिती गंभीर

जिल्ह्यात २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. या तलावांमध्ये एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरबंध, परसोडी, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार-कोहळी, कान्हेरी, चान्ना, डाेंगरगाव, एलकाझरी, जांभोरा, कोका, लोभी, पिंपळगाव, चपराळ, इंदोरा, दिघोरी, दहेगाव व झरी यांचा समावेश आहे. या तलावांत मे प्रारंभी ६.४३० दलघमी इतका उपयुक्त जलसाठा असून टक्केवारी २५.३०९ इतकी आहे. यातील केवळ पिंपळगाव तलावात १ दलघमीपेक्षा अधिक उपयुक्त जलसाठा असून इतर तलावांना कोरड पडली आहे. यातील अनेक तलावात थेंबभर पाणीही मिळेनासे झाले आहे.

नदी, नाल्यांचे पात्र पडले कोरडे

जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह अन्य उपनद्यांत पाण्याची पातळी कमालीने घटली आहे. चुलबंद, बावनथडी व सूर नदीचे पात्र कोरडे पडले आहे. गोसे व बावनथडी धरणाचे बॅक वॉटर परिसरातही स्थिती नाजूक होत चालली आहे. नाल्यांतील पात्र तर मार्च महिन्यातच कोरडे पडले आहेत.

नळ योजना होणार प्रभावीत

जिल्ह्यातील नदी, नाल्यांवर गावागावातील नळ योजनांच्या विहिरी आहेत. यातील काही पाणी पुरवठा योजनांच्या विहिरींनी तळ गाठले आहे. मे महिन्याच्या पंधरवाडात नळ योजना प्रभावीत होवून विहिरी कोरड्या पडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

प्रकल्प दलघमी टक्केवारी
मध्यम १६.७७ ३९.१७
लघु १४.६७ २७.४०
मामा ६.४३ २५.३०
एकूण ३७.८८ ३१.१०

Web Title: Only 31 percent water in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.