भरपावसाळ्यात बावनथडी धरणात केवळ ३२ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:32 AM2021-07-26T04:32:11+5:302021-07-26T04:32:11+5:30
तुमसर : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असला तरी तुमसर तालुक्यात केवळ तुरळक पाऊस पडत आहे. आंतरराज्य बावनथडी धरणात ...
तुमसर : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असला तरी तुमसर तालुक्यात केवळ तुरळक पाऊस पडत आहे. आंतरराज्य बावनथडी धरणात केवळ ३२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. जाणवणेकरता पाण्याचा विसर्ग मागील तेरा दिवसांपासून सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अल्पपावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली नाही. मागील वर्षी जुलै महिन्यात धरणात ३४ टक्के पाणीसाठा होता.
बावनथडी आंतरराज्यीय धरणात भरपावसाळ्यात केवळ ३२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी हा जलसाठा ३४ टक्के इतका होता. त्यानंतर मध्य प्रदेशात व बावनथडी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरण शंभर टक्के भरले होते. पावसाळ्यात जुलै महिन्यात यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रात अल्पपाऊस पडला. त्यामुळे धरणात केवळ ३२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मागील तेरा दिवसांपूर्वी बावनथडी धरणातून धान रोवणीकरिता १८ क्यूमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातही दमदार पावसाने हजेरी न लावल्यामुळे बावनथडी नदीपात्रात पाण्याची वाढ झालेली नाही. तसेच धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची अजूनपर्यंत दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला नाही.
तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी धान पेरणी वेळेत केली होती. त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. शेतीला भेगा पडू लागल्या. त्यामुळे धानाचे परे वाळू लागले होते. धानाचे परे जिवंत राहावे व रोवणी व्हावी याकरिता बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी धान रोवणी सुरू केली. बावनथडी धरणातून पाणी विसर्ग झाल्यामुळे सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रातील धान रोहिणीला सुरुवात करण्यात आली.
बॉक्स
दमदार पावसाची प्रतीक्षा
मागील दोन दिवसांपासून तुमसर तालुक्यात पाऊस पडला नाही. कुठे तुरळक पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवसा ऊन तर आकाशात ढगांची गर्दी दिसते. परंतु पाऊस पडत नाही. रविवारी दिवसभर उन्ह तापले. त्यामुळे उकाडा वाढला आहे. धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे.