धान भरडाईत केवळ ६० टक्केच उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:33+5:302021-03-10T04:35:33+5:30
मुखरू बागडे पालांदूर : भरडाई दरवाढीचा गुंता सुटत नाही तोच आता धान उताऱ्याचा प्रश्न पुढे आला आहे. शासकीय नियमानुसार ...
मुखरू बागडे
पालांदूर : भरडाई दरवाढीचा गुंता सुटत नाही तोच आता धान उताऱ्याचा प्रश्न पुढे आला आहे. शासकीय नियमानुसार ६७ टक्के उतारा अपेक्षित असताना यंदा केवळ ६० टक्केच उतारा हाती येत आहे. त्यामुळे मिलर्स अडचणीत येण्याची शक्यता असून भरडाईसाठी धान न उचलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावित होण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत किमतीत धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या धान खरेदी अंतिम टप्प्यात आहे. २७ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. गोदाम हाऊसफूल झाले आहेत. अनेक ठिकाणी खुल्या जागेत ताडपत्रीचा आधार घेऊन धान पोते ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला भरडाईचा दर वाढीवरून शेतकऱ्यांनी असहकार पुकारला होता. त्यामुळे भरडाईची आणि त्यातून गोदामाची समस्या निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी मध्यस्थी करून हा तिढा सोडविला. मिलर्सनी भरडाईसाठी धान उचलला.
परंतु धान भरडाई करीत असताना मिलर्सला ६० टक्के उतारा येत आहे. शासनाच्या नियमानुसार १०० किलो धानापासून ६७ किलो तांदूळ देणे अपेक्षित असते. मात्र, अपेक्षित उतारा येत नसल्याने मिलर्स अडचणीत आले आहेत. नाइलाजाने त्यांना भरडाई बंद करण्याची वेळ आली आहे. ६० टक्के उताऱ्यातही ५० टक्के तांदळाचा तुकडा (खंडा) पडतो. शासनाला केवळ २५ टक्केच तुकडा अपेक्षित आहे. या सर्व प्रकारामुळे धान भरडाई पुन्हा प्रभावी होण्याची शक्यता आहे. वेळेत धान भरडाई झाली नाही तर उन्हाळी धान खरेदी करण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिलर्सना ३५ हजारांचे नुकसान
धान भरडाई करताना उचल केलेल्या धानाचा उतारा ६० टक्क्यांच्या पुढे जात नाही. असे मिलर्स संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. यातील सुमारे १२५ मिलर्सनी पहिल्या टप्प्यात धानाची उचल केली. त्यातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले. तांदळाच्या प्रति लाॅटमागे ३५ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे.
प्रत्येक हंगामात मिलिंग टेस्ट अपेक्षित
शासनाच्या माध्यमातून भरडाईसाठी डिओ देण्यापूर्वी धानाची मिलिंग टेस्ट होणे गरजेचे आहे. ६७ टक्के उताऱ्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे. प्रत्येक हंगाम सारखा नसतो. गत हंगाम धानासाठी पोषक नव्हता. मावा, तुडतुड्याने धान प्रभावित झाले. ४० किलोचा कट्टा अनेक केंद्रांवर ३५ किलो भरत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामात मिलिंग टेस्ट अपेक्षित आहे.
मिलर्सकडून लेखी स्वरूपात उताऱ्याच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली नाही. त्यांनी उचललेल्या धानाच्या प्रमाणात तांदूळ येणे सुरू आहे. तक्रार असल्यास शासनाकडून मार्गदर्शन मागवून योग्य निर्णय घेण्यात येईल.
-अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.