केवळ हुंदके, आक्रोश आणि निरव शांतता
By admin | Published: March 13, 2017 12:25 AM2017-03-13T00:25:51+5:302017-03-13T00:25:51+5:30
जन्मानंतर मृत्यू अटळ आहे. पंरतु जो देशाकरीता शहीद होतो त्याला वीरमरण येते. तुमसर येथील मंगेश घनश्याम बालपांडे हा जवान शहीद झाला.
वीरपुत्राला साश्रुनयनांनी निरोप : तुमसर शहरात होळीच्या दिवशी धीरगंभीर वातावरण
मोहन भोयर तुमसर
जन्मानंतर मृत्यू अटळ आहे. पंरतु जो देशाकरीता शहीद होतो त्याला वीरमरण येते. तुमसर येथील मंगेश घनश्याम बालपांडे हा जवान शहीद झाला. होळीच्या दिवशी तुमसरात शोककळा पसरली. सगळे रस्ते शहीद मंगेशच्या घराकडे गर्दीने ओसंडून वाहत होते. बालपांडे कुटुंबीयांचा एकुलता मुलगा शहीद झाला. त्या वीरमातेला धीर देण्यासाठी सर्वांची रीघ लागली होती. केवळ हुंदके, आक्रोश आणि निरव शंतता गोवर्धन नगरातील त्यांच्या घरी दिसून आली.
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात हल्लेखोरांशी लढताना तुमसरच्या मंगेश बालपांडे या सुपुत्राला वीरमरण आले. शनिवारच्या सकाळच्या या घटनेची माहिती त्यांच्या चुलतभावाला सांगण्यात आली. वृध्द आई व पत्नीला मंगेश जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. त्यानंतर नातेवाईक गोळा झाले. मुलगा कसा असेल, पती कसा असेल या विचाराने त्यांनी पाणी पिऊन त्यांनी रात्र जागून काढली.
सकाळी मंगेशच्या वीरमरणाची वार्ता तुमसरात पोहोचताच आई व पत्नी नि:शब्द झाल्या. ६ फेब्रुवारी रोजी ते तुमसर येथे घरी आले होते. १२ दिवस कुटूंबीयासोबत तुमसरात राहिले. त्यांचे स्थानांतरण छत्तीसगड येथील जगदलपूर येथे झाले होते. तत्पूर्वी ते जम्मू काश्मिर, नवी दिल्ली येथे कार्यरत होते. १९ फेब्रुवारीला ते जगदलपूरला रवाना होण्यापूर्वी मुलाचा कार्यक्रम केला होता.
रविवारी सकाळी ९.३० वाजता वीरपुत्राचे पार्थिव घेऊन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तुमसरात दाखल होताच आई व पत्नीने हंबरडा फोडला. घरी वाहनातून पार्थिव उतरविताना केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. महिलांसोबतच पुरूषांच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. तुमसर शहर अक्षरश: रविवारी सकाळी थांबले होते. शहीद मंगेशने अखेरपर्यंत माओवाद्यांशी झुंज दिल्याचे केंद्रीय पोलीस दलाचे जवान राजेशकुमार यांनी सांगितले.
सैन्यात कार्यरत प्रत्येक जवान देशाकरिता शहीद होण्याचे स्वप्न पाहतो. पोलीस किंवा सैन्य दलात मृत्यू साक्षात २४ तास समोर उभा राहतो, असे सांगून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपअधीक्षक एम. एच. खोब्रागडे यांनी अश्रुंना वाट करून दिली.
निरागस मुलगा-मुलगी स्तब्ध
शहीद मंगेश बालपांडे यांची लाडकी लेक पलक व गंधर्व घरी एवढी गर्दी तथा आक्रोश, हुंदक्यांचा आवाज ऐकून स्तब्ध झाले होते. पलकने पप्पा उठा, तुम्ही केव्हा आले, झोपून का आहात? असे म्हणत रडत होती. रडूनरडून थकल्यावर गंधर्व एका नातेवाईकाच्या कुशीत झोपी गेला, हे दृष्य अनेकांना हेलावून टाकले होते. अंत्ययात्रेच्या वाहनावर ‘शहीद मंगेश अमर रहे’ असे बॅनर लावले होते. वाहनाच्या खिडकीतून गंधर्वने पोस्टर बाजूला करीत माझ्या पप्पांना कुठे नेत आहात? असा प्रश्न त्या निरागस चिमुकल्याला पडला असावा.
तुमसरातील मंगेश बालपांडे पहिला शहीद
स्वातंत्र्याच्या काळात तुमसर शहरात शहिदांची नोंद आहे. पंरतु नंतरच्या काळात मंगेश प्रथमच शहिद झाला. तुमसरच्या वीरपुत्राच्या अखेरच्या सलामीकरीता रविवारी अख्खे शहर स्तब्ध झाले होते. प्रत्येकांनी शहराच्या मुख्य मार्गावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून साश्रुनयनांनी निरोप दिला.
अखेरच्या संभाषणाच्या आठवणी काढून हंबरडा
शहीद मंगेश यांची आई प्रमिला व पत्नी शितल यांनी मंगेशच्या अखेरच्या संभाषणाची आठवण काढून-काढून रडत होत्या. परत येण्याची हमी दिल्यावर एकट्याने साथ का सोडली? अशी आर्त हाक देताना उपस्थितांनाही गहीवरून आले.