डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विकणारे सापडले केवळ पाच जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:16+5:302021-08-19T04:39:16+5:30
भंडारा : कोरोनाच्या फैलावानंतर प्रत्येक जण आरोग्याची विशेष अशी काळजी घेऊ लागला आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात आजही अनेक ...
भंडारा : कोरोनाच्या फैलावानंतर प्रत्येक जण आरोग्याची विशेष अशी काळजी घेऊ लागला आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात आजही अनेक जण सर्दी, ताप, अंगदुखीसारखे आजार जाणवल्यानंतरही डॉक्टरांकडे न जाता थेट औषधी दुकान गाठत आहेत. अनेक विक्रेते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देत असल्याचा प्रकार भंडारा शहरातही दिसून येत आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने औषधी दुकानांची तपासणी केली. आतापर्यंत पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आजही अन्न व औषध प्रशासन विभागाकडे भंडारा, गोंदिया जिल्ह्यांचा एकत्रच कार्यालय आहे. येथे नव्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. ग्रामीण भागात काही बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. यासाठी आरोग्य विभागाने शोधमोहीम राबवून अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची गरज आहे.
एकीकडे साधे दुकान सुरू करतानाही शेकडो कागदपत्रांसह प्रशासनाच्या अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. मात्र, ग्रामीण भागातील अनेक डॉक्टरांकडे शैक्षणिक कागदपत्रे नसतानाही रुग्णांना तपासून लुटण्याचे प्रकार काही ठिकाणी दिसून येत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
बॉक्स
कोरोना काळात सर्दी-अंगदुखीसाठी डॉक्टरकडे कोण जाणार?
कोरोना काळात डॉक्टरांकडे कोण जाणार अशी मानसिकता आजही अनेकांमध्ये दिसून येते. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर एप्रिल महिन्यात नागरिक दवाखान्यात जाण्यासाठी टाळाटाळ करत होते. दवाखान्यात गेल्यानंतर क्वॉरंटाइन होण्याच्या भीतीने आजही अनेक जण दवाखान्यात जात नाहीत. त्यातच वातावरण बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसारखी लक्षणे जाणवत असतानाही डॉक्टरकडे जात नाहीत. विशेषकरून ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आहे.
वातावरण बदलामुळे अनेकांना सर्दी, अंगदुखीसारखी लक्षणे जाणवल्यावरही डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच औषधे, गोळ्या खातात. हे कोणाच्याही जिवावर बेतू शकते.
बॉक्स
अनेक ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी
भंडारा जिल्ह्याचे ठिकाण आहे. मात्र, येथेही काही औषध विक्रेते हे डॉक्टरांच्या चिठ्ठीविनाच औषधे, गोळ्या देतात. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. आरोग्य विभागाने यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात तपासणीकडे अनेक वयोवृद्धांचे दुर्लक्ष होत आहे.
भंडारा जिल्ह्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नागरिक तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. दवाखान्यात जाण्याऐवजी औषधी दुकानात जातात आणि औषध, गोळ्या खरेदी करून दिवस काढतात. ग्रामीण भागात आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर औषध, गोळ्या खाल्ल्याने होणारे संभाव्य धोके त्यातून कसा जिवाला धोका पोहोचू शकतो, याबाबत माहिती देण्याची गरज आहे.
कोट
सर्वप्रथम नागरिकांनी कोणतीही औषधे, गोळ्या खरेदी करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खरेदी करावी. औषध प्रशासन कार्यालयाकडून औषधी दुकानांची नियमित तपासणी करण्यात येते. आम्ही स्वतः अनेकदा नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. कोणताही त्रास जाणवत असल्यास रुग्णांनी सर्वप्रथम डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.
-प्रशांत रामटेके, अन्न औषध प्रशासन, सहायक आयुक्त, भंडारा