जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या उरल्या नावापुरत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:15 PM2017-12-03T22:15:00+5:302017-12-03T22:15:26+5:30
आॅनलाईन लोकमत
भंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अशामुळे सुटतील काय, असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे.
तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी गावातील तंटे गावातच सोडविता यावे आणि गावात शांतता प्रस्तापित करता यावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून तंटामुक्त समित्यांची संकल्पना अस्तित्वात आणली. संपूर्ण राज्यात समित्यांची ग्रामपंचायतीत ठराव घेऊन स्थापना केली. यामध्ये तंटामुक्त मोहीम राबवून गाव तंटामुक्त करण्याच्या समित्यांना लाखो रुपयाचा पुरस्कारही दिल्या जातो. आजमितीस भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या अस्तित्वात आहेत. मात्र अनेक समित्यांचे काम केवळ कागदोपत्री सुरु असल्याचे वास्तव्य दिसून येते. बहुतांश पुरस्कारप्राप्त गावातच आता तंटे होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर येत आहे. बºयाच गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व्यसनाधिन व अवैध धंद्यांना शह देणारे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीचा असल्याचा उद्देश सफल होण्याबाबत शासंकता निर्माण होत आहे. बऱ्याच दिवसांपासून तंटामुक्त समित्या आपल्या उद्देशापासून फारकत घेत असल्याने पोलीस प्रशासनाला आजही गावात वादविवादाप्रसंगी दाखल व्हावे लागत आहे. यामुळे समित्यांच्या कर्तव्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची गरज आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनानेही तंटामुक्त समित्यांच्या अकार्यक्षमतेचा आढावा घेऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा देणे गरजेचे आहे. अन्यथा गावातील तंटे गावात सुटण्याऐवजी ते वेशीबाहेर येऊन त्याची नक्कीच पोलिसात तक्रार पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समित्या निरुत्साही
तंटामुक्त समित्यांनी जर खरोखरच जर ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविल्यास समाजात जनजागृती होऊ शकते. परंतु समित्याच जर निरुत्साही असतील तर समित्यांचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अशी आहेत तंटामुक्तीची कर्तव्ये
गावातील संपूर्ण दारुबंदी करून अनिष्ट चालीरिती, परंपरांना प्रतिबंध करणे, त्याचबरोबर विविध उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबविणे, वनसंवर्धन व वनसंरक्षण करणे, ग्रामसुरक्षा दल स्थापन करून गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, शिवाय गावातील तंटे गावातच सामंजस्याने सोडविण्याबरोबर समित्यांनी गणेशोत्सव, बकरी ईद, ईद ए मिलाद आदी धार्मिक कार्यक्रम पोलीस संरक्षणाविना साजरे करणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे अशी समितीची कर्तव्य असले तरी एकही पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.