राज्यातील पाच पांडवांचे एकमेव मंदिर पिपरा गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:11 PM2018-11-30T23:11:52+5:302018-11-30T23:12:13+5:30
ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात पांडवांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा आजही दिसून येतात. तुमसर तालुक्याच्या पिपरा या परिसरात पांडव अज्ञात वासादरम्यान वास्तव्यास असल्याची आख्यायीका सांगितली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात पांडवांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा आजही दिसून येतात. तुमसर तालुक्याच्या पिपरा या परिसरात पांडव अज्ञात वासादरम्यान वास्तव्यास असल्याची आख्यायीका सांगितली जाते.
या ठिकाणी पाच पांडवांसह श्रीकृष्णाची मूर्ती आढळली. महाराष्ट्रातील पाच पांडवांचे हे एकमेव मंदिर होय. दरवर्षी याठिकाणी भागवत सप्ताहासह यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. शनिवार १ डिसेंबर रोजी येथे यात्रा महोत्सव आयोजित असून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
तुमसर तालुक्यातील निसर्गरम्य पिपरा गाव पुरातन आहे. या गावात उत्खनन करताना एका शेतात भगवान श्रीकृष्ण, युधीष्ठीर, भीम, अर्जून, नकूल, सहदेव यांच्या दगडी मूर्ती सापडल्या होत्या. त्यामुळे त्यांची गावकऱ्यांची एका मंदिरात स्थापना केली.
इतिहास अभ्यासक मो.सईद शेख यांनी या मंदिराला भेट दिली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक घनश्याम निनावे यांनी या परिसराचा इतिहास आणि पौराणिक महत्व सांगितले. ते म्हणाले, या परिसरात गवळी लोकांचे वास्तव्य होते. पाण्याची बोडी होती. १८५० च्या आसपासची घटना असावी, एक पंडित येथे वास्तव्याला होते. त्यांनी केलेल्या तपाच्या प्रभावाने जमीन फाटली आणि पांडवांच्या मुर्त्या वर आल्या. या मुर्त्यांची एका वृक्षाखाली पूजा केली जात होती. १९८३ साली ट्रस्ट स्थापन करून पाच पांडवांचे मंदिर उभारण्यात आले. धर्मराज युधीष्ठीराची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यासाठी आणण्याचा प्रयत्न झाला. दोन बैल गाड्या आणि ४० माणसांनी ही मूर्ती जाग्यावरून हटली नाही. तेथेच चौथरा तयार करून १९९५ साली रामदास गुरू महाराज यांच्या मार्गदर्शनात पूजा करण्यात आली.
अशा या मंदिरात गत ३४ वर्षापासून नियमित रूपाने भागवत सप्ताह आयोजित केला जातो. यंदा २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत सप्ताह आयोजित करण्यात आला. शनिवार १ डिसेंबर रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबिर, योग प्राणायम शिबिर, भजन, पूजन, किर्तन आदींमुळे हा परिसर भक्तीमय झाला. यात्रेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढमधून भाविकांची गर्दी होते. भागवत कथा वाचन टेकाम महाराज करीत असून ट्रस्टचे अध्यक्ष फुलचंद बडवाईक व कमिटीचे पदाधिकारी यशस्वितेसाठी प्रयत्नशिल आहेत.
वास्तव्य करून पांडव गेले रामटेकला
अज्ञातवासादरम्यान पाच पांडवांचे पिपरा परिसरात वास्तव्य होते. हा परिसर त्याकाळी घनदाट जंगलाने आणि सातपुडा पर्वत रांगांनी व्यापलेला आहे. येथे एकत्र पाच पांडव, कोडोपन, मातामंदिर, नागदेव मंदिर, भस्मासूर, ठाकूरदेव आणि हनुमंताचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील पाच पांडव मंदिर हे एकमेव असल्याचे मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष फुलचंद बडवाईक यांनी सांगितले.