सात वर्गांना शिकवण्यासाठी केवळ तीन शिक्षक; संतप्त गावकरी धडकले जिल्हा परिषदेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:46 PM2024-07-09T15:46:54+5:302024-07-09T15:48:05+5:30
Bhandara : माटोरातील शेकडो गावकऱ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील माटोरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग सात आणि शिक्षक फक्त तीन आहेत. रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेला धडक दिली. पदाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला. अखेर २३ जुलैपर्यंत शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे आश्वासन मिळाल्यावर गावकरी माघारी वळले.
माटोरा शाळेत रिक्त पदावर तातडीने शिक्षक देण्यात यावे, विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, यासंबंधी निवेदन व माहिती अनेकदा शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व पालकांनी मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिली होती. २७ मे २०२३ व ११ मार्च २०२४ ला प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. परंतु, जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. शाळा सुरू झाल्यानंतरही शिक्षकाकंची पदे भरली नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पालकांनी ६ जुलैला पालक सभा घेऊन शाळा कायम बंद करून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, गावकऱ्यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरात दाखल होऊन शिक्षणाधिकारी रवींद्र सोनकुसरे यांना घेराव केला. प्रश्नांची सरबत्ती केल्याने शिक्षणाधिकारी भांबावून गेले होते.
पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी
घेराव सुरू असताना जिल्हा परिषद सदस्य रजनिश बन्सोड, यशवंत सोनकुसरे, माजी सदस्य नरेंद्र झंझाड, पंचायत समिती सदस्य स्वाती मेश्राम, विकेश मेश्राम, सूर्यभान हुमणे, सरपंच किशोर निंबार्ते यांनी माटोरा शाळेतील दूरवस्थेसंबंधी शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिली. पालक व प्रशासनात मध्यस्थाची भूमिका बजावली.
बोरगाव शाळेत चार वर्गासाठी एक शिक्षक
सिल्ली :भंडारा तालुक्यातील बोरगाव बुज पुनर्वसन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, चार वर्गासाठी केवळ एकच शिक्षक आहे. शाळेला दुसरा शिक्षक देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथे जिल्हा परिषद शाळेची पक्की इमारत आहे. वर्ग १ ते ४ मध्ये एकूण ५५ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. पटसंख्येनुसार दोन शिक्षकांची गरज आहे. मात्र, चार वर्गाना शिकविण्यासाठी केवळ विजयी गोंडणे हे एकमेव शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढणार, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शाळेला दुसरा शिक्षक त्वरित देण्याची मागणी सरपंच संजय लांजेवार, जगदीश लांजेवार, चतुराम बावनकुळे, अमोल खोब्रागडे, विश्वनाथ हटवार, पंकज पडोळे, मंदा पडोळे आदींनी केली आहे.