जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार सांभाळतात केवळ दोन कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:45 AM2019-06-23T00:45:52+5:302019-06-23T00:46:53+5:30
संपूर्ण भंडारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेच्या अखत्यारितील जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू आहे. त्यातही एक कर्मचारी कंत्राटी आणि दुसरा कायम स्वरूप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण भंडारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेच्या अखत्यारितील जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू आहे. त्यातही एक कर्मचारी कंत्राटी आणि दुसरा कायम स्वरूप आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता राखताना अडचणीचा सामना करावा लागतो आणि नागरिकांना अशुद्ध पाणी प्राशन करावे लागते.
भंडारा शहराला पाणीपुरवठा करणारी जलशुद्धीकरण केंद्र शासकीय रुग्णालय परिसरात आहे. या केंद्रात वैनगंगेचे पाणी शुद्ध करून नळावाटे नागरिकांना पुरविले जाते. कालबाह्य झालेले येथील संयत्र वारंवार नादुरूस्त होते. तसेच तीन पाळी येथील यंत्रणा सुरू असते. परंतु सध्या येथे दोनच कर्मचारी कार्यरत आहे. खरे तर येथे १८ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यात पंप आॅपरेटर, सफाई कामगार, खोदकाम करणाºयांचा समावेश आहे. परंतु गत काही वर्षांपासून दोघांच्या भरोशावर जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार सुरू आहे. विशेष म्हणजे त्यातील एक कर्मचारी हा २००८ साली सेवानिवृत्त झाला आहे. सध्या त्यांना पाच हजार रूपये महिनाप्रमाणे कंत्राटी तत्वावर काम दिले आहे. तर एक कर्मचारी कायमस्वरूपी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जलशुद्धीकरण करताना या दोघांची मोठी कसरत होते. वारंवार नगरपरिषदेला कळवूनही पाणीपुरवठत्त विभाग याकडे लक्ष देत नाही. परिणामी नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो आणि त्यातून आजार बळावतात.
भंडारा शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र सुरक्षा रक्षकाअभावी वाºयावर आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या या जलशुद्धीकरण केंद्रात कुणीही थेट प्रवेश करू शकतो. एखाद्या माथेफिरूने घातपात केल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. परंतु नगरपरिषद प्रशासन असंवेदनशील झाली असून पदाधिकाºयांच्या अनास्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या सर्व बाजू उघड्या आहेत.