खुली सैन्य भरती आजपासून
By admin | Published: January 6, 2016 12:39 AM2016-01-06T00:39:56+5:302016-01-06T00:39:56+5:30
भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे ती पहिल्यांदा खुली सैनिक भरती उद्या बुधवारपासून येथील शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होत आहे.
६ ते १७ जानेवारीपर्यंत कार्यक्रम : ४७ हजार १५५ उमेदवारांची आॅनलाईन नोंदणी
भंडारा : भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे ती पहिल्यांदा खुली सैनिक भरती उद्या बुधवारपासून येथील शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होत आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या भरतीसाठी विदर्भातील १० जिल्ह्यातून येणार आहेत. ६ ^ते १६ जानेवारी या कालावधीत ही सैन्य भरती होत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी धीरजकुमार, कर्नल महेंद्रकुमार जोशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी मंगळवारला दुपारी क्रीडा संकुलाची पाहणी करून सैन्य भरती व्यवस्थेचा आढावा घेतला.
सैन्य भरतीसाठी पहिल्यांदा आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. यामध्ये विदर्भातील ४७ हजार १५५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ६ जानेवारीला पहाटे ३ वाजता वर्धा जिल्ह्यासाठी भरती प्रक्रिया सुरू होईल. भरतीसाठी सर्व उमेदवारांना बसस्थानकावर एकत्रित करून त्यानंतर एका रांगेत जिल्हा क्रीडा संकुल येथे भरती प्रक्रियेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
१५० पोलिसांचा चोख बंदोबस्त
उमेदवारांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. क्रीडा संकुलाबाहेर ११६ पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून यामध्ये ६ पोलीस निरिक्षक, ११ पोलीस उपनिरिक्षक, ८० पोलीस कर्मचारी, वाहतूक नियंत्रण शाखेचे २० कर्मचारी तैनात करण्यात येतील. याशिवाय रेल्वे स्थानक, बसस्थानक, उमेदवारांचे राहण्याचे ठिकाणी ३० अतिरिक्त पोलीस असा १५० पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
डॉक्टरांची विशेष चमू नियुक्त
सैन्य भरतीसाठी डॉक्टरांची विशेष चमू नियुक्त करण्यात आली असून सकाळी ५.४५ पासून उमेदवारांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. सैन्य भरती कालावधीमध्ये शहरातील सैन्य भरतीच्या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, यासाठी वीज वितरण कंपनीमार्फत विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
तात्पुरते शौचालयाची व्यवस्था
जिल्हा क्रीडा संकुल, उमेदवारांचे राहण्याचे ठिकाण, बसस्थानक आणि रेल्वे स्थानक याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय भंडारा नगर परिषदेच्या सहकार्याने फिरते मुत्रीघर व तात्पुरते शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. सैन्य भरती आणि राहण्याच्या ठिकाणी रोगराई पसरू नये, यासाठी १० सफाई कर्मचारी तैनात राहणार आहेत. उमेदवारांना अल्पदरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था सहकार्य करणार आहेत. (प्रतिनिधी)
इतवारी पॅसेंजरला अतिरिक्त कोच
भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी ६ ते १७ जानेवारी या कालावधीत रेल्वे प्रशासनाद्वारे रायपूर-इतवारी व इतवारी-रायपूर या पॅसेंजर रेल्वेला अतिरिक्त सामान्य कोच लावण्यात येणार आहे. ही रेल्वे नागपूरहून सायंकाळी ७ वाजता आणि वरठी येथून सायंकाळी ८ वाजता सुटेल. परिवहन महामंडळातर्फे रेल्वेने प्रवास करणाऱ्या उमेदवारांसाठी भंडारा ते वरठी या दरम्यान बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय बसने प्रवास करणाऱ्या उमेदवारांसाठी नागपूरकरीता जादा बसेस सोडण्यात येणार आहे.
पाच ठिकाणी राहण्याची सुविधा
उमेदवारांना राहण्याची सुविधा व्हावी, यासाठी नगर परिषद गांधी विद्यालय, पोलीस ठाणे इमारत, संताजी मंगल कार्यालय, किसनलाल स्मृती सभागृह दुर्गा मंदिर समोर, बावणे कुणबी मंगल कार्यालय, पोलीस ठाण्याच्यामागे आदी ठिकाणे उमेदवारांना राहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.