साकोलीत सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री
By Admin | Published: March 30, 2016 12:54 AM2016-03-30T00:54:26+5:302016-03-30T00:54:26+5:30
राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीला बंदीचे आदेश दिल्यानंतरही अन्न व औषधी प्रशासनाच्या कृपेने साकोली तालुक्यात ..
गुटख्यासाठी शाळकरी मुलांची गर्दी : अन्न व औषधी विभागाची कार्यवाही कागदोपत्रीच
संजय साठवणे साकोली
राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीला बंदीचे आदेश दिल्यानंतरही अन्न व औषधी प्रशासनाच्या कृपेने साकोली तालुक्यात गुटखा व सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री होत आहे. गुटखा खाण्यासाठी पानटपरीवर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. सुंगंधीत तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगाच्या रुग्णात वाढ होत असली तरी संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. या बंदीसाठी शासन उपाययोजना करीत असले तरी कारवाई मात्र शून्य आहे.
राज्यात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री, साठवणूक करणे यावर शासनाने बंदी आणली. सुरुवातीला या बंदीचा प्रभाव दिसून आला. मात्र त्यानंतर हा प्रभाव कमी होत आला. साकोली तालुक्यात सुगंधित तंबाखूविक्री करणारे खुलेआम आपापल्या वाहनाने तंबाखू प्रत्येक पानटपरीत पोहचवून देतात. काही दुकानदार दुकानातून या तंबाखूची विक्री करतात. त्यामुळे या विक्रेत्यांना अन्न व औषधी प्रशासनाचे अभय आहे. साकोली परिसरात या दुकानदारावर कागदोपत्री कारवाई होताना दिसते. या दुकानदारांचे गोदाम मात्र तंबाखूने भरलेले असतात.
पानटपऱ्यावर विद्यार्थ्यांची गर्दी
सुगंधित तंबाखूचे खर्रे खाण्यासाठी विद्यार्थ्यांची पानटपऱ्यांवर मोठी गर्दी जमते. विद्यार्थी शाळेत जाताना खर्रा शाळेत घेऊन जातात. हा खर्रा खाल्ल्यामुळे कर्करोग होतो. याची जाणीव असूनही खर्ऱ्याच्या आहारी गेलेल्यांना खर्रा खाल्ल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे सुगंधित तंबाधू विक्रीवर बंदी गरजेचे आहे.
तंबाखूची साठवणूक
साकोली येथे सुगंधित तंबाखूची खरेदी आठवड्यातून दोनदा केली जाते व मोठे व्यापारी ही तंबाखू आपल्या गोडावूनमध्ये साठवणूक करून ठेवतात व दररोज आॅर्डरप्रमाणे विक्री करतात.
प्रशासनाचे दुर्लक्ष
या तंबाखुविक्रीवर प्रशासनाने कायमची बंदी आणावी असे आदेश असताना मात्र साकोलीत या नियमाला बगल देण्यात येत आहे. एखादेवेळी संबंधित विभागाचे अधिकारी येतात व लहानशा पानटपरीवर धाड मारतात. मात्र मोठ्या व्यापाऱ्यांना सोडून देतात. त्यामुळे हा सुगंधित तंबाखूविक्रीचा गोरखधंदा जोमात सुरु राहतो.