लाखांदूर तालुक्यात खुलेआम अवैध दारूविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:35+5:302021-04-30T04:44:35+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या राज्य सरकारने राज्यात गत १५ दिवसांपासून संचारबंदी सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात अवैध दारूविक्री खुलेआम ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या राज्य सरकारने राज्यात गत १५ दिवसांपासून संचारबंदी सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात अवैध दारूविक्री खुलेआम सुरू आहे. दिघोरी व लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये अवैध दारूविक्री जोमात सुरू असून या दारूविक्रेत्याविरोधात कार्यवाही होत नसल्याने दारूविक्रेत्यांना कोणाचे आशीर्वाद मिळत आहेत, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन परिश्रम घेत आहे. दारूच्या अड्ड्यावर अनेक तळीराम मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद असताना अवैध दारूचे अड्डे मात्र खुलेआम सुरू आहेत.
या अवैध दारूविक्रेत्यांना कोणाचे आशीर्वाद मिळत आहेत, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांकडून कार्यवाही होत नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
ग्रामीण भागातील अवैध दारूविक्रीच्या विरोधात कार्यवाही होत नसल्याने दारूविक्रेत्यांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊनमुळे काही व्यवसाय बंद पडल्याने काही जण दारूचा व्यवसाय करतात. महाविद्यालय बंद असल्याने महाविद्यालयीन युवकांना दारूचे व्यसन लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून लाखांदूर तालुक्यात अवैद्य दारूविक्री जोमात सुरू आहे. रस्त्याच्या कडेलाच पानटपऱ्या आणि घरांतून देशी, विदेशी दारूविक्री केली जात आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारा कामगार वर्ग आणि युवक हे दारूच्या व्यसनात गुरफटत जाऊन अनेक संसार उघड्यावर पडत आहेत. पोलीस विभागाच्या डोळ्यासमोरच अवैध दारूविक्री सुरू असते. संबंधित विभागाला हप्ते पोहोचत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. दरम्यान, अवैध दारूविक्री करणाऱ्यांची दहशत असल्याने कोणीही तक्रार करण्यास पुढाकार घेत नाही. पोलिसांनीच कठोर पावले उचलत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.