कर्कापुरात उघड्यावर भरली शाळा
By admin | Published: December 2, 2015 12:33 AM2015-12-02T00:33:45+5:302015-12-02T00:33:45+5:30
तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत १ ते ७ या तुकड्यांना केवळ तीन शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शिक्षकांची पदे रिक्त : शाळेला कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत १ ते ७ या तुकड्यांना केवळ तीन शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी ग्रामस्थांनी आज सोमवारला विद्यार्थ्यांची शाळा उघड्यावर घेऊन जिल्हा परिषदेचे लक्ष वेधले आहे. असे करुनही शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिला आहे.
कर्कापूर येथे जिल्हा परिषदेची पूर्व माध्यमिक शाळा आहे. या शाळेत १ ते ७ तुकड्या असून तीन शिक्षक नियुक्त आहेत. या शाळेत ११८ विद्यार्थी असताना अध्यापनाचे कार्य केवळ दोन शिक्षक करीत आहेत. मुख्याध्यापक व दोन शिक्षक कार्यरत असताना एक शिक्षक वैद्यकीय रजेवर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी ग्रामपंचायत तथा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ठराव घेण्यात आले. परंतु या ठरावाची दखल घेण्यात आली. सात तुकड्यांना केवळ दोन शिक्षक असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. आज सोमवारला शालेय वेळेत विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात गोळा झाले. यावेळी विद्यार्थ्यांनीच स्वत: तासिका घेतली. याची माहिती तुमसर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला मिळताच गटशिक्षणाधिकारी नंदनवार कर्कापूर येथे दाखल झाले.
यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निष्क्रीयतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. दरम्यान गटशिक्षणाधिकारी नंदनवार यांनी एक शिक्षक देण्याचे तोंडी आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)