ऑनलाइन सातबारा न झालेल्या ७ गावांतील धान खरेदीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:45+5:302021-06-29T04:23:45+5:30
गोंदिया : सातबारा ऑनलाइन न झाल्याने धान खरेदीपासून वंचित असलेल्या ७ गावांतील शेतकऱ्यांची ही समस्या आ. विनोद अग्रवाल यांच्या ...
गोंदिया : सातबारा ऑनलाइन न झाल्याने धान खरेदीपासून वंचित असलेल्या ७ गावांतील शेतकऱ्यांची ही समस्या आ. विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्थीने अखेर सुटली आहे. याबाबत शासन आदेश निर्गमित झाले असून, या गावांतील धान खरेदीचा प्रश्न सुटला आहे.
गोंदियालगतच्या ७ गावांमधील शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाइन न झाल्यामुळे शेतकरी बांधवांना रबी धानाची विक्री कुठे करायची, असा प्रश्न उद्भवला होता.
यासंदर्भात शेतकरी बांधवांनी आ. अग्रवाल यांची भेट घेऊन धान विक्रीचा तिढा सोडवण्याची विनंती केली होती. शासन निर्णयाप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाइन पोर्टलवर नोंदवला गेला नव्हता त्यांचे धान खरेदी करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. आ. अग्रवाल यांनी गोंदिया ते मुंबई पाठपुरावा केला. अन्न व नागरी पुरवठा विभाग सचिव विलास पाटील व सहसचिवांची भेट घेत त्यांना ७ गावांमधील सातबारा ऑनलाइन न झालेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याबाबत विनंती केली होती.
त्याअनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून, ऑनलाइन सातबारा न झालेल्या ७ गावांचा धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.