उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची झाली पळापळ
By admin | Published: February 4, 2017 12:25 AM2017-02-04T00:25:41+5:302017-02-04T00:25:41+5:30
शासकीय योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी कर्मचारी नेहमीच पुढाकार घेतात किंबहुना सतत पाठपुरावा करतात.
भंडारा : शासकीय योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी कर्मचारी नेहमीच पुढाकार घेतात किंबहुना सतत पाठपुरावा करतात. अशाच एका शासकीय योजनेचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी कर्मचारी भल्या पहाटेच गावात दाखल होऊन त्यांच्या मागेमागे धावत असल्याचा नवा प्रकार आता बघायला मिळत आहे. शौचालयाचे अनुदान प्राप्त करा व बांधकाम करून निरोगी आरोग्य जगा असा मोलाचा संदेश या पथकातील अधिकारी ग्रामस्थांना देत आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना शौचालय बांधण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
भंडारा जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समिती, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तथा ग्रामपंचायत प्रशासन कार्यालय लागले आहेत. यात ग्रामस्थांची मोलाची मदत या प्रशासकीय यंत्रणेला घ्यावी लागत आहे. तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे गुडमार्गिंग पथकाने दोन दिवसापूर्वी भल्या पहाटेच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना ‘तांब्या’सह रस्त्यात अडविले होते.
त्यानंतर त्यांना गुलाब फुल देऊन त्यांना उघड्यावर शौचास न जाण्याची तंबी दिली होती. पोलीस कारवाई होण्याच्या भीतीने ग्रामस्थांनी उघड्यावर जाणे टाळले.
गुरूवारला गुडमार्गिंन पथकाने तुमसरचे गट विकास अधिकारी गिरीष धायगुडे यांच्या नेतृत्वात नवरगांव, बोरी व उमरवाडा येथे पुन्हा एकदा पहाटेच गाव गाठले. पथकाची माहिती नसल्याने ग्रामस्थांनी नि:संकोचपणे हातात ‘लोटा’ घेऊन घराबाहेर निघाले. मात्र, यावेळी अनेकजण अलगत पथकाच्या जाळ्यात अडकले. जो आला त्यांना, शौचालय बांधण्याचा उपदेश दिले. एवढ्यावर हे पथक न थांबता त्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करून शौचालय बांधण्याचे अभिवचन घेऊन परतवले. पथकाच्या अशा स्वागत मोहिमेने लोटाधारी ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे मार्गदर्शनात उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात पोलीस विभागाचे सहकार्य घेण्यात आले आहे. या मोहिमेत सरपंच विनोद गुरवे, मिनाक्षी लाडसे, कक्षाचे अंकुश गभने, राजेश येरणे, नविन ढबाले, संजय मोहतुरे, ईखार, पल्लवी तिडके, हर्षाली ढोके, शशिकांत घोडीचोर, पोर्णिमा डुंभरे, वर्षा दहीकर, ग्रामसेवक एच. एम. पडोळे, सिंंदराम, राठोड, सतीश सेलोकर, चिमणकर, उल्हास पडोळे, हटवार, गायधने, गावनेर, इनवाते, ग्रामपंचायत सदस्य गुलाब लाडसे, लक्ष्मी लाडसे, लक्ष्मी कामथे, उमाशंकर कामथे, चंद्रशेखर कामथे, प्रशांत गुरवे, पोलीस शिपाई केशव नागोसे, दिपक जाधव, महेश शेंडे यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
पथकाची अशी केली विभागणी
महिला व पुरूषांचे असे दोन पथक तयार करण्यात आले. गावातील युवक व नागरिकांकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी गावालगतच्या मार्गांवर पाळत ठेवली. शेताकडे जाणारा मार्ग, नदीकडे जाणारा मार्गांचा समावेश होता. पहाटेला उठून शौचास गेलेल्यांना उघड्यावर शौचविधी करताना पकडण्यात आले. काही जाण्याच्या मार्गात तर काही प्रात:विधी उरकून येताना सापडले.
या सर्वांना पथकाने गुलाबाचे फुल देऊन त्यांना घरी शौचालय बांधण्याचे मार्गदर्शन केले. भविष्यात उघड्यावर शौचास गेल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली. त्यामुळे ज्यांच्याकडे शौचालय नाही, अशांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. पथकाच्या मोहिमेमुळे लोटाधारींची चांगलीच पळापळ झाली आहे.