अड्याळ येथे आॅपरेशन मुस्कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:29 AM2017-07-20T00:29:17+5:302017-07-20T00:29:17+5:30
अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या सोनेगावमधून एक अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती.
सोनेगाव येथील घटना : गुजरातमधून दोघांना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ / चिचाळ : अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या सोनेगावमधून एक अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती. ती कोणासोबत गेली, तशी तक्रार मुलीच्या आईने दिली होती. त्यामुळे आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३६६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अड्याळ पोलीसांनी ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत शोध घेत सदर मुलगी व १८ वर्षीय तरूणाला गुजरात राज्यातून जिल्ह्यात परत आणल्याची माहिती पोलिस निरिक्षक ढोबळे यांनी दिली.
सदर मुलगी अल्पवयीन आहे, घरातील कोणत्याही व्यक्तीला न सांगता पीडित मुलगी एका मुलासोबत पळून गेली होती. सोनेगाव इथून आठ दिवसाआधी दोन मुली पळून गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यापैकी एका मुलीला नागपुरहून काही दिवसांआधी पकडण्यात आले होते. परंतु या पीडित अल्पवयीन मुलीचा मात्र शोध लागला नव्हता. मुलीच्या आईला मुलीला शोधून आणण्याचा शब्द तर दिला होता पण शोध मात्र लागला नव्हता आणि त्यामुळे येथील पोलीस मोठ्या बिकट परिस्थितीत अडकले होते.
जिल्हा पोलीस अंतर्गत ‘आॅपरेशन मुस्कान’हा उपक्रम सुरु आहे. मुलगी घरातून पसार झाल्यामुळे तीचा शोध घेणे आव्हान ठरले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.विनिता साहू, जिल्हा पोलीस सहाय्यक अधीक्षक रश्मी नांदेडकर तसेच पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर ठिकस यांच्या मार्गदर्शनात अड्याळचे पोलीस निरिक्षक सुरेश ढोबळे, पीएसआय एन.सी. डोंगरे व पोलीस कर्मचाऱ्यांंना या प्रकरणात यश लाभले. जिथून माहिती मिळत गेली तिथे पोलिसांची चमू मुलीच्या शोधातच होती. अखेर तो दिवस उजाडला आणि पोलिसांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकू लागले. मुलगी गुजरातमध्ये असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्याच दिवशी पोलिसांनी गुजरात राज्य पोलिसांशी संपर्क साधला. तिथे जावून मुलीला ताब्यात घेतले. मुलीला आईच्या स्वाधीन करण्यात आले.