माहितीदूतमुळे समाजसेवेची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:26 PM2018-10-14T21:26:58+5:302018-10-14T21:27:22+5:30
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व युनिसेफच्या सहकार्याने युवा माहितीदूत उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवितांना तसेच जॉब मिळविण्यासाठी मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व युनिसेफच्या सहकार्याने युवा माहितीदूत उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवितांना तसेच जॉब मिळविण्यासाठी मदत होणार आहे. या उपक्रमात युवा माहितीदूतास प्रत्येकी ५० व्यक्तींना शासनाच्या योजनांची माहिती द्यावयाची आहे. सदर उपक्रम विद्यार्थ्यांनी आपले शिक्षणाकडे लक्ष देवून ६ महिन्याच्या कालावधीत करावयाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समाज सेवेची संधीही मिळणार असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना अनेक शासकीय योजनांची माहितीही मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापिठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके यांनी केले.
साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात युवा माहितीदूत उपक्रमाची जिल्हास्तरीय कार्यशाळा राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रा. अशोक चुटे, रा.से.योजनेचे समन्वयक डॉ. किशोर नागपूरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रा. सि.जे. खूणे, एल. पी. नागपूरकर, प्रा. शिवनकर, प्रा. धरम शहारे उपस्थित होते.
पदवीधर झाल्यानंतर नोकरी व करिअर यामधील फरक विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, करिअर म्हणजे स्वत: व्यवसाय करुन किंवा मेहनत करुन आत्मनिर्भर होणे व सक्षम होऊन दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे होय. स्वत:च्या विकास सोबतच दुसºयांचाही विकास करा, अशी विद्यार्थ्यांशी संवादात्मक चर्चा डॉ. केशव वाळके केली.
युवा माहिती दूत उपक्रमात ३० वैयक्तिक लाभाच्या योजना व १० सामूहिक योजना आहेत. त्यांची माहिती लोकांना पटवून द्यावयाची आहे.
त्यासाठी या योजनांचा अभ्यास माहिती दूतांनी करावा व योजनेची माहिती लोकांना द्यावी. अभ्यासाव्यतिकरीक्त वेळेचे व्यवस्थापन करुन हे काम करावे. विद्यार्थी स्वत: युवा माहितीदूत या अप्लीकेशनवर स्वत:च्या नावाची नोंदणी करु शकतात. युवा माहिती दूत अशी ओळख मिळेल व राज्य शासनाच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे केशव वाळके यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यांनी युवा माहितीदूत उपक्रमाचे सादरीकरण केले.
प्रा. चुटे यांनी ५० योजनेचा या युवा माहिती दूतातर्फे प्रसार व प्रचार होणार आहे. त्यामुळे तळागाळातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेची माहिती मिळेल, असे सांगितले.
प्रास्ताविकात किशोर नागपूर यांनी सांगितले की, युनिसेफच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारा युवा माहिती दूत हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात एक मार्गदर्शन नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. संचालन प्रा. शिवनकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विभागीय कार्यक्रम अधिकारी प्रा. धरम शहारे यांनी मानले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.